बोदवड – बोदवड नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने १७ पैकी ९ जागा जिंकत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना होम ग्राऊंडवरच धक्का दिला आहे. या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले असून यात राष्ट्रवादीला (NCP) ७, शिवसेनेला (Shiv Sena) ९ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला (BJP) एका ठिकाणी विजय मिळाला आहे. बोदवड नगरपंचायतीसाठी सुरू असलेल्या मतदानाची मोजणी आज सकाळी दहा वाजेपासून प्रारंभ झाली. पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी ठेवली होती. बोदवडमध्ये सत्ता असलेल्या भाजपला मात्र केवळ खाते उघडता आले आहे. मात्र मुक्ताईनगर मतदार संघ असलेल्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारांनी नंतरच्या फेरींमध्ये बाजी पलटवली. यात राष्ट्रवादीला मागे टाकत शिवसेना पुढे गेली आहे.
आमदार चंद्रकांत पाटलांकडून खडसेंना धोबीपछाड
बोदवड नगरपंचायतीच्या आत्तापर्यंत निकालामध्ये १७ पैकी राष्ट्रवादीला ७ जागांवर विजय मिळविता आला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने १७ पैकी १७ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. परंतु, शिवसेनेने आतापर्यंतच्या निकालात मुसंडी मारल्याने एकनाथ खडसेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर धक्का बसल्याचे चित्र सध्यातरी आहे.
बोदवड नगरपंचायत
एकुण जागा-१७
भाजप- १
शिवसेना-९
काँग्रेस-०
राष्ट्रवादी-७
इतर(अपक्ष)-०