पुणे – कोणत्याही प्रश्नाचे उत्तर चुटकीसरशी देणारे सर्च इंजिन गुगल २७ सप्टेंबरला आपला जन्मदिवस साजरा करतो. गुगलचा आज २३ वा वाढदिवस आहे. प्रत्येक विशेष दिवसाप्रमाणे आजही गुगलने आपल्या होम पेजवर याचे डुडल तयार केले आहे. यामध्ये गुगलच्या स्पेलिंगच्या मध्ये सजलेला केक दिसत आहे. हे अॅनिमेटेड डुडल आहे.
म्हणून बदलली वाढदिवसाची तारीख
तांत्रिक स्वरूपात गुगलची स्थापना ४ सप्टेंबर १९९८ रोजी झाली होती. आधीचे सात वर्ष याच तारखेला गुगलचा वाढदिवस साजरा करण्यात आला. परंतु २७ सप्टेंबरला विक्रमी वेळा सर्च इंजिनवर शोध घेण्यात आला. त्यामुळे २७ सप्टेंबरलाच गुगलचा वाढदिवस साजरा केला जात आहे.
शंभरहून अधिक भाषांमध्ये शोध
गुगल नेहमीच आकर्षक डुडल बनवतो. संबंधित व्यक्तीच्या समाजाप्रती असलेल्या योगदानाचे खास अंदाजात डुडलद्वारे कौतुक केले जाते. जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन म्हणून गुगलची ओळख आहे. गुगलवर आज शंभरहून अधिक भाषांमध्ये सर्च केले जाऊ शकते. भारतातही गुगलने स्थानिक पातळीवर स्वतःला तयार केले आहे, यावर अनेक भाषांना जोडले गेले आहे.
यशोभरारी
सर्गेई ब्रिन आणि लॅरी पेज यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेले गुगल सर्च इंजिन आज जगात व्यापक स्वरूपात वापरले जात आहे. सध्या गुगलचे सीईओ सुंदर पिचई आहेत. त्यांनी २४ ऑक्टोबर २०१५ मध्ये गुगलच्या सीईओपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यादरम्यान त्यांनी अल्फाबेट इंकमध्येसुद्धा हेच पद स्वीकारले. ३ डिसेंबर २०१९ रोजी पिचई अल्फाबेटचे सीईओ झाले होते.