विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात लसींचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टिने कोवॅक्सिन लसीचे उत्पादन करण्यास इतर कंपन्यांना परवानगी देण्याची केंद्र सरकारची तयारी आहे, असे केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडविय यांनी सांगितले आहे. याबाबत लस उत्पादकांशी चर्चा सुरू आहे. जर लस उत्पादक कंपन्यांकडे आवश्यक पायाभूत सुविधा आणि साधने असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्यांना तत्काळ परवानगी देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोवॅक्सिन लशीचे भारतात उत्पादन झाल्यामुळे तिच्या उत्पादनासाठी एपीआयची समस्या उद्भवणार नाही. या संशोधनात सहकारी कंपन्या आवश्यकतेनुसार पुरवठ्यासाठी सक्षम आहेत. देशात १८ वर्षांवरील वयाच्या लोकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर कंपल्सिव्ह लायसेंसिंगच्या माध्यमातून दुसऱ्या कंपन्यासुद्धा कोवॅक्सिनच्या उत्पादनाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अनेक राज्यांतर्फे केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्यासाठी चर्चा सुरू आहे. औषध निर्माण क्षेत्रातील कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्यात लसीचे उत्पादन करण्याची क्षमता असेल तर त्यांनी परवानगीसाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
परदेशी कंपन्यांशी चर्चा सुरू
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय परदेशी कंपन्यांशी चर्चा करत आहे. आगामी काळात कंपन्यांशी खरेदीचा करार झाल्यास त्याचा फायदा सर्व राज्यांना होऊ शकतो. तसेच कॉर्पोरेट कंपन्या, खासगी रुग्णालये सुद्धा थेट परदेशी लस खरेदी करू शकणार आहे. काही देशांकडून उधारीवर लस घेऊन देशात लसीचे उत्पादन वाढल्यानंतर त्यांना ते परत करता येईल का या पर्यायावरही विचार सुरू असल्याचे मंत्री मांडविय यांनी सांगितले.