चांदवडच्या रेणुकादेवीचे ऑनलाइन दर्शन मिळणार

विष्णू थोरे , चांदवड 
चांदवड – कोरोनामुळे नवरात्रोत्सवात चांदवड येथील मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ फक्त पुजारी पूजा करणार आहे. त्याचे थेट प्रसारण ऑनलाइन व फेसबुक टीव्हीच्या माध्यमाने केले जाणार आहे. भाविकांनी ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा व प्रशासनास सहकार्य करावे, कोणीही भाविक दर्शनाकरिता श्री रेणुका माता मंदिरात जाऊ नये असे आवाहन रेणुका मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक सुभाष पवार व चांदवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी केले आहे.
केदराई माता मंदिर ही बंद राहणारतालुक्यातील केदराई देवी नवरात्र उत्सवही साध्या पद्धतीने साजरा होणार असून प्रशासन व मंदिर संस्थेच्या वतीने सदर मंदिर नवरात्र काळात  बंद राहणार आहे. मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ फक्त पुजारी पूजा करणार असून त्याचे प्रसारण ऑनलाइन व फेसबुक टीव्हीच्या माध्यमाने प्रसारण होणार आहे. भाविकांनी ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा व प्रशासनास सहकार्य करावे कोणीही भाविक दर्शनाकरिता मंदिरात जाऊ नये असे आवाहन सहा.पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी केले आहे.

भाविकांचा भ्रमनिरास

गेली अनेक वर्षे दुरून दुरून भाविक नवरात्रीला लाखोंच्या संख्येने देवी रेणुकेच्या दर्शनासाठी येत असतात. रेणुका देवी अनेकांचे कुलदैवत असून स्रिया नवस फेडण्यासाठी नऊ दिवस इथे घटी बसून आपला नवस फेडतात. परंतु यंदा अनेक भाविकांचा भ्रमनिरास होणार असून त्यांनाही घरूनच देवीची पूजा करावी लागणार आहे. नऊ दिवस इथे रोज पूजा आरती आणि भजनांचे कार्यक्रम होतात, झिम्मा फुगडी होते. माहेरी आलेल्या सासुरवाशिणी सारख्या सर्व स्रिया गुण्यागोविंदाने इथे राहतात. भक्त निवास गजबजते. आता हा आनंद कुणालाही घेता येणार नसल्याने रुखरुख लागली आहे.
सपनात आली देवी
सांगू मी कुणाला
माहेरी जाऊ कशी
नवरात्रीच्या सणाला…
अशीच सर्वांची अवस्था झाली आहे.

छोट्या मोठया उद्योग धंद्यावर कुऱ्हाड

नवरात्रोत्सवात मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील व परिसरातील छोटे मोठे व्यापारी ,खेळणीवाले, मिठाईवाले,हॉटेल वाले, आईस्क्रीम वाले,फुग्यावाले आपले दुकान लावून आपला व्यापार करून चांगला नफा कमवत असतात. लाखोंची उलाढाल नवरात्रात होत असते. नवरात्र उत्सव बंद असल्याने अनेकांना याचा फटका बसला असून या ठिकाणी उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक जणांच्या पोटावर उपासमारीची वेळ आली आहे. सर्कसवाले, तमासगीर या कलावंतांचीही मोठी परवड झाली आहे.

भजन मंडळाचे मंदावले सूर…
सकाळ संध्याकाळ देवीच्या आरतीने व भजनाने मंदिराचे वातावरण प्रसन्न करणारे गायकांचे व संगीताचे सूर आता ऐकायला मिळणार नाही. दिवसभर थकलेल्या प्रवाशाच्या आणि दुरून आलेल्या भाविकाच्या मनाला आणि देहाला लौकिकाचा आनंद हे संगीत आणि भक्तिगीते देत असतात. परिसरातील अनेक गायक,वादक नवरात्रातीत देवीच्या पुढे आपली कला दाखवून धन्य होतात. इतरांनाही आनंद देतात.या वर्षी त्यांचेही सूर मुके झाल्याने वाटावरणातली प्रसन्नता हरवली आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here