इंडिया दर्पण विशेष – कवी आणि कविता -डॉ. संजीवनी तडेगावकर 

स्त्रियांच्या अंतर्मनाचे निनाद आणि मातीच्या गंधवेणा घेऊन येणारी कविता : कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर 

कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर या मराठीतील एक संवेदनशील मनाच्या भावकवयित्री. त्यांची कविता मनाला संमोहित करणारी आहे. स्त्रियांमधील राधा,मीरेच्या तरल भाववृत्तीला काळजातल्या शब्दातून कवितेत टिपणारी कवयित्री आहेत. त्यांची कविता म्हणजे सर्व वयोगटातील स्त्रियांच्या मनातली घुसमट व्यक्त करणारी सखी. मनाच्या कोवळ्या फांदीला फुटलेले लुसलुसी फुटवे.त्यांची कविता म्हणजे बंद घरातून, अरुंद दारातून बाहेर पडतांना होणा-या यातनांचा जागर आहे. त्यांची कविता ही अनेक मुक्या मनांची पालखी घेऊन येते, आणि कबीराचे गाणे गात गात भूपाळीतून भैरवी पर्यंत पोहोचते.त्यांच्या कवितेला स्वत:ची लय आहे, पोत आहे.त्यांची कविता ही गावखेड्यातील बाया बापड्यांच्या मुक्या गंधवेणा घेऊन येते. तशीच अनेक लेकीबाळींच्या जिवाचा कोंडमारा,वेदनेचा विरह,मनाचं आक्रंदन, घेऊन येते. स्त्रीजीवनाच्या अंतर्मनाचे निनाद टिपताना दिसते. थोडक्यात कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकरांची कविता ही अस्सल जीवनानुभवाच्या दु:खाची, उध्वस्त, उद्विग्न मरणासन्न यातनांची कविता आहे.

प्रा. लक्ष्मण महाडिक
(लेखक ज्येष्ठ कवी आहेत)

कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर यांचे ‘फुटवे’, ‘अरुंद दारातून बाहेर पडताना’, संदर्भासहित’ हे तीन काव्यसंग्रह ‘चिगूर’ ललित लेखसंग्रह, ‘पापुद्रे’ निवडक लेखिकांचा मुलाखतसंग्रह, ‘ आणि झरे मोकळे झाले ‘ समीक्षा , ‘ एक होती सारा ’ अमृता प्रीतम यांच्या पुस्तकाचा अनुवाद, इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. आगामी ‘ समीक्षा: मराठवाड्याची कविता ’ हा समीक्षाग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. मराठी विषयात एम.ए करून ११८० नंतरच्या मराठी कवयित्रींच्या कावितेतील स्री जाणीवा – एक चिकित्सक अभ्यास या विषयात पीएच्.डी केलेली आहे. जालना येथून प्रकाशित होणा-या ‘ आशयघन ’ त्रैमासिकाच्या  संपादनाचे काम करतात. त्या महाराष्ट्र शासन रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ सदस्य आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती इंदिरा संत पुरस्कार, प्रसाद बन पुरस्कार, नांदेड, भि.ग. रोहमारे काव्य पुरस्कार, कोपरगाव. यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार पुणे ,चंद्रभागा साहित्य पुरस्कार, जालना.धोंडीराम माने उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, औरंगाबाद.सुभद्रा राज्य काव्य पुरस्कार, सेलू, परभणी, कला गौरव राज्यसाहित्य पुरस्कार, तरडगाव, सातारा, कुसुमाग्रज उत्कृष्ट राज्यकाव्य पुरस्कार वैजापूर,

अजिंठा काव्य पुरस्कार, जालना, मराठवाड़ा कलागौरव पुरस्कार, औरंगाबाद व इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या साहित्यकृती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड,संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर इथे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

मुलींच्या आयुष्यात प्रत्येक पावलागणिक स्थित्यंतर असतं. लग्न म्हणजे मुलींचा दुसरा जन्म. पाहिलं गाव,पहिलं नाव पुसलं जाऊन पुन्हा नव्यानं तिचं बारसं घातलं जातं.  लग्नात मुलीच्या अंगाला हळद लागते. हातावर मेंदी रंगते. त्यावेळी तिने पाहिलेली बालपणातील स्वप्न आणि त्यांच्या  स्मृतीत पकडून  ठेवलेल्या सा-या पारंब्या कायमच्या हातातून निसटून जातात. जिथं बालपण गेलं त्या घराला-दाराला, त्या गावाला, तिथल्या मातीला, नदी-नाल्याला, झाडा-झुडपाला ती दुरावत जाते. कारण ज्याच्याशी लग्न झालं त्याच्या जन्मगाठीला गाईसारखी बांधली जाते. आणि तिथेच तिच्या आयुष्यात मानपान, रितीरिवाज यांच्या ओझ्याखाली ती वाकून जाते. स्त्रियांचा जन्मापासूनचा साराच प्रवास अंधारातला. अंदाज आणि तर्कावर चालण्याचा. पावलोपावली आवतीभोवती अविश्वास पसरलेला. अशा माणसांच्या सोबतीनं आयुष्याचा प्रवास चालतो. त्या सा-याच फितूर होणा-या पाउलवाटा. पावलागणिक पायात रूतणारे काटे, सा-याच वाटा वळणाच्या … आडवळणाच्या…खाचखळग्याच्या. यातून वाटचाल करताना सा-याच नात्यांचं ओझं डोईजड होतं. पण उतरून ठेवता येत नाही. अनिच्छेने घेऊन चालावं लागतं.नात्यांची सांदमोड करणं कठीण होऊन जातं. यातून होणारी मनाची होरपळ आयुष्यभर जाळत असते. एकूणच सा-याच स्त्रियांच्या व्यथा आणि कथा थोड्याफार फरकाने सारख्याच असतात. उजेडाच्या आशेने आपाल्यापरीने सा-याच वाटचाल करतात.पण अजूनही उजेडाचा म्हणावा इतका हमरस्ता त्यांना लाभला नाही. याची खंत मांडतांना कवयित्री संजीवनी तडेगावकर लिहितात-

बाई,

       जन्मभर अशुभ शापांचे व्रण कपाळावर गोंदून

       परंपरेने लादलेल्या अगणिक यातनांना तू गळ्यात ओवलेस

       अहेवाचे दान समजून आणि

       बिनबोभाट टिचत-फुटत राहिलीस तकलादू चुड्यातून

       बाई,

       युगानुयुगांच्या मतलबी निगरगट्ट अवघड वाटांनी चाचपडत राहिलीस 

       खूपदा ठोकरूनही तुला कधीच सापडला नाही  …. उजेडाचा हमरस्ता

अंधाराचं आयुष्य वाट्याला येऊनही ग्रहणाचे दान देणे ही मानसिकताच स्त्रीच्या गुलामीचं द्योतक ठरते.याचबरोबर स्त्रियांच्या विकासाला तसेच त्यांच्यावरील अन्याय आणि अत्याचाराला स्त्रियाच कशा जबाबदार आहेत. स्त्रियांच्या ‘अस्तित्वाचा चंद्र  चांदण्यांनीच गिळला’ चंद्र आणि चांदण्या या प्रतिमामधून त्याप्रभावीपणे मांडून जातात.

ग्रामीण स्त्रियांचं आयुष्य विविध रंगांनी भरलेलं आहे. दु:खानं व्यापलेलं आहे. शिक्षणाच्या गंधस्पर्शाने आज ती समाजव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रात आत्मविश्वासाने पाऊल ठेवत आहे. असे असले तरी पुरुषप्रधान संस्कृतीच्या वर्चस्वाला ती अद्याप छेद देऊ शकलेली नाही. लोकशाही समाजव्यवस्थेत तिला पन्नास टक्के सहभाग मिळाला. तरी वास्तवात चित्र वेगळंच पहायला मिळतं. याचं वास्तव रेखाटताना अत्यंत संयमित शब्दातून पुरुषांच्या मानसिकतेचे वाभाडे त्यांची कविता काढतांना दिसते. आणि त्याचवेळी स्त्रियांच्या सामाजिक जीवनातील अपमानाचे घाव आणि वेदना मांडत त्यांच्या शापित स्वतंत्र्याचा, मुलभूत हक्कांवरील येणा-या पुरुषीबंधनांचा पंचनामा वेशीवर टांगायला मागेपुढे पाहत नाही. या संदर्भात कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर लिहितात-

       बायकोने यावं निवडून आणि गावानं काढावी नवऱ्याची मिरवणूक

       अशा किती मनाआतल्या अपमानित सन्मानाचे घाव सोसून असते बाई

       जुन्या धान्याचं बी लिंपण घालून जपावं तशी ती जगते आयुष्यभर

       सर्वदूर फेसाळून काठोकाठ भरलेल्या तळ्याचं पाणी आटूनउरावा तळात गाळ

       तशा कडवट यातनांना पचवून

       बाई उरते फक्त आगटीत भाजलेल्या हुरड्याचे चवदार कणीस चोळून

       फेकलेल्या खाकरीगत.

असं एकंदर स्त्रीचे आयुष्य. तिची उपयोगिता हाच इथला संकुचित व्यवहार. तिच्या भवनांना इथं थारा नाही. तिला स्थान नाही. तरी ती मधमाशीसारखी फुलाफुलातून मकरंद जमवत राहते. तिचा कळी ते फुला,फळापर्यंतचा  प्रवास अत्यंत संघर्षमय असतो. हा संघर्ष स्वत:बरोबर आणि सभोवतालाबरोबर असतो. अनेकदा तिच्या मनाच्या विरुध्द पुरुषी सत्तेचे आक्रमणे होतात. कधीकधी ती परिस्थितीच्या रेट्यात भरडली जाते, चिरडली जाते. हे सांगताना कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर समर्पक शब्दातून आपले विचात मांडतात.

        मधमाशांनी कमविलेला मधुरसाचा कांदा

        कोयता लावून काढून घ्यावा हिकमतीने

        तसे तिचे कौमार्य कुस्करले जाते

        त्याच्या कामांध  मर्दानी मिठीत 

        पुरुषी सत्तेच्या अहंकारी झुल्यावर 

        आणि झुलत राहते तिचे युगायुगाचे लाघवी स्त्रीत्व 

        पुढे तिच्या इच्छांना काचणाऱ्या  यातनांच्या चरकात 

        ती कोंबते स्वतःला निमूटपणे रस निघून सर्व गमावलेल्या सोतरीगत.

प्रत्येक मुलीमध्ये एक स्त्री असते. प्रत्येक स्त्रीमध्ये एक आई असते. हे आईपण सर्वश्रेष्ठ रूप असतं. ईश्वराचं  दुसरं रूप आई असते. ईश्वरानं स्त्रीला पूर्णत्व बहाल केलं आहे. हे पुर्णत्व तिच्या आईपणात सामावलेलं असतं. आणि म्हणून आई ही स्त्रीच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची भूमिका ठरते. आई कोणाचीही असो कोकराची, बकराची, किंवा लेकराची ती आईच असते. इतिहास प्रसिद्ध रायगडावरील हिरकणीची कथा शिकविताना तिच्यातल्या आईपणाची महती कवयित्रीच्या मनावर रुतून बसते. त्यासंदर्भात लिहितांना डॉ.तडेगावकर लिहितात –

पोटच्या  लेकरासाठी  उरातल्या काळोखानं हंबरलीस

        कासावीस झालिस तेव्हा 

        तान्ह्याला पाजण्यासाठी 

        तुझ्या पान्ह्यालाच खरी भूक लागली होती

        काल वर्गात कविता शिकविताना आईची वेदना

        माझ्या डोळ्यांच्या कडेकपारीतून वाहत आली 

        माय हिरकणी  तुझा पान्हा मला दे.

स्त्रीमधल्या आईच हे ममत्व कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर हिरकणीच्या रुपानं अत्यंत तरल शब्दात अधोरेखित करतात.

महाराष्ट्राची संस्कृती प्राचीन संस्कृती आहे. अक्षरलिपी शोध लागला नव्हता तेव्हाही जीवनशिक्षण दिलं जात होतं. या जीवनशिक्षणातील एक भाग म्हणजे भातुकलीचा खेळ. भातुकलीचा खेळ हा जीवनाचा मेळ घालणारा अत्यंत महत्वाचा खेळ होता. याखेळातून अगदीच बालपणापासून माणसामाणसातील नाती, त्यांचा सहसंबंध, मानसन्मान, रीतीभाती,रूढी परंपरा, नीतिमूल्ये, जीवनमूल्ये,सांस्कृतिकमूल्ये, देवतांचे विधी, व्रत वैकल्ये, धार्मिक विधी अशा अनेक दृष्टीकोनातून भातुकली प्रकरण महत्वाचं होतं. ती मुलामुलींच्या भावी जीवनाची रंगीत तालीम होती. तो जीवनाचा प्राथमिक स्तरावरचा आकृतिबंध होता. ते सगळं जीवनाला दिशादर्शक असंच होतं. बालपणातील भातुकलीच्या खेळातील आठवण सांगतांना कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर लिहितात-

परकरी वयाच्या त्या निरागस चारचौघीनी

        काड्यामुड्यांचा मांडव उभारून बसल्या बोहल्यावर लुटुपुटीचा खेळ खेळत

        लावून हळद नवरा-नवरीला भरला मळवट

        कपाळी मोत्यांचे वाशिंग बांधून घोड्यावर मिरविला नवरदेव

        उधळिल्या अक्षता लागले लग्न

        वाजविले समद्याजनींनी मनमुराद चौघडे .

अचानक आलेल्या पवसाचा आणि कडाडलेल्या विजेचा भातुकलीच्या खेळावर आणि  बालमनावर झालेला परिणाम अत्यंत सुदर रीतीने तडेगावकर मांडतात. खेळ संपत येत असतांना वीज कडाडली आणि सर्वांनी धूम ठोकली. हे अनुभव सा-याच मुलींच्या वाट्याला आलेले. लग्न होऊन सासरी जातांना प्रत्येक मुलीच्या स्वप्नावर पाणी पडून, विजा कोसळून त्यांचे मनातले डाव मोडलेले असणार. त्यांच्या स्वप्नाची राख झालेली असणार. म्हणजे प्रत्येकीच्या आयुष्याचा खेळ झालेला असणार. कितीतरी डाव मोडले असणार. मनासारखे सारेच डाव झाले नसणार. भातुकली आणि वास्तवजीवन यात फारसा फरक नसतो. फरक असतो तो वयाचा आणि विचारांचा. सासरी गृहप्रवेश करताना आजही महाराष्ट्रातल्या संस्कृतीत धान्याने भरलेले माप उंबऱ्यात पायाने लवंडले जाते. ती एक परंपरा आहे. पण तिथेच तिच्या आयुष्यातली सांडलवंड  सुरू होते. साडणं, लंवडनं, भरणं,  आवरणं, सावरणं आणि पुन्हा रीतं होणं.  हे जीवनातले सगळे खेळ तिला खेळावे लागतात. यावर भाष्य करताना कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर लिहितात-

सासरी गृहप्रवेश करताना भरलेले धान्याचे माप 

         तिने उंबऱ्यात पायाने लवंडले 

         तेव्हाच तिच्या आयुष्याची सांड लवंड सुरू झाली ….

         ठसठशीत कुंकू लेवून तिने ओवले स्वतःला काळया पोथीत

         आणि मालविला उशाचा दिवा 

         तेव्हापासून तिच्या जन्म भोगाच्या मरणवेदना सुरू झाल्या

सासर आणि माहेर हा प्रवास सुरु होतांना आजही प्रचलित रूढी,परंपरेनुसार धन्याचं माप ठोकरून स्त्रियांचा संसार सुरु होतो. असे असले तरी नंतरच्या जीवनात असे काही ठोकरने सन्मानाचे नसते.याची जाणीव पावलोपावली होत राहते. हे सांगताना कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर लिहितात-

पहिल्यांदा सासरी नांदायला आले तेव्हा

        ठोकरले वाड्याच्या उंबऱ्यात 

        तर सासू म्हणाली, डोळे आले का?’

        पुढं खरंच आले माझे डोळे 

        खूप दिवस तिच्या खसालतीची सल डोळ्यात राहिली खुपत

        अगणिक इच्छांना जाळून सांज-सकाळ बसले चुलीपुढं धुपत .

कल्पनेतलं आणि वास्तवातलं यात जमीनआसमानाचं अंतर असतं. या अंतराची जाणीव स्त्रियांशिवाय कुणाला अनुभवता येत नाही. जन्म एका ठिकाणी आणि उर्वरित आयुष्य नको त्या ठिकाणी जगावं लागतं. कालपरवापर्यंत जिथं कसलंच स्वतंत्र्य नव्हतं. अशा घरात,संसारात पाऊल ठेवताना डोळ्यातली,मनातली सारी स्वप्नं दाराबाहेर ठेवूनच घरात प्रवेश करायचा असतो. तरी काही येतातच सोबत. हे त्या अतिशय समर्पक शब्दात सांगतात-

       स्वप्नाळू डोळ्यांनी मी तुझ्या घर-अंगणात पाऊल ठेवलं

       आणि उजाड माळरानंच स्वागतासाठी पुढ्यात आलं

       मग मीही रुजवून घेतलं स्वत:ला- माळरानावर

       वटवृक्ष होऊन सावली देण्याच्या निर्धारानं

       स्वप्नांनी दाखवू नयेत वाकुल्या

       म्हणून पापणीत केलं बंद त्यांना 

आणि बजावलं

       मर्जीशिवाय उतरायचं नाही कधीच मनाच्या अंगणात.

मनाच्या मर्जीशिवाय स्त्रियांच्या स्वप्नांना कोणतेच स्थान नाही. जी स्वयंभू आहे, सर्जनशील आहे. निर्माणक्षम आहे. सामर्थ्यवान आहे. अशा स्त्रीला मात्र घरात आणि समाजव्यवस्थेत अजूनही म्हणावं असे स्थान मिळत नाही. तिच्या दु:खाची जातकुळीच वेगळी आहे. ते शोधूनही सापडत नाही. या दु:खाच्या कुळाचे साम्य ती रानावनातल्या बांधामेरावरच्याच्या बाभळीच्या झाडाशी जोडण्याचा प्रयत्न करताना दिसते. या संदर्भात त्या लिहितात-

शोधूनही सापडले नाही माणसात अशा दुःखाचे कूळ

        शोधत मी भटकले वणवण रानावनात 

        आणि दमन थांबले, काटेरी बाभळीच्या फाटक्या सावलीत

        तेंव्हा कधीकाळी तिच्या शेंगांचे बांधलेले पायतोडे

        खुळखुळू वाजू लागले कानात ….

        तेव्हा मी विचारले; विश्वासाने तिला न सापडलेल्या दुःखाचे कूळ 

        ती व्याकूळ होऊन म्हणाली, मला तरी कुठे सापडले बाई 

        माझ्या काटेरी दुःखाचे मूळ.

स्त्रियांच्या दु:खाचं मूळ आणि कुळ हे बाभळीच्या काट्यासारखं टोकदार आहे. अनुकुचीदार आहे. बाभूळ हे कट्याचं टोकदार दु:खं सांभाळत जीवनातील वादळ वा-याशी, पाऊस-पाण्याशी संघर्ष करते. काट्याकुट्याचं आयुष्य उराशी घेऊन सोनेरी स्वप्नांना फुलातून फुलवते आहे. मातीशी नातं टिकून बांधामेराशी का होईना तग धरून उभी आहे. असंच ग्रामीण स्त्रीचं आयुष्य आहे. जे येईल वाट्याला त्याला सामोरे जाते आहे. आयुष्याच्या वाटचालीत अनेकदा दु:खाचा अंधार झाकोळून येतो. या सभोवतालच्या अंधारात दिव्याच्या का होईना प्रकाशात ती तिची नाती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. हे मांडताना त्यांचे शब्द जड होतात. त्या लिहितात-

होऊन घराची सांज लाविते दिव्यांच्या वाती

        काळोख भोवती माझ्या का उजेड जपतो नाती

        तुळशीच्या मंद सुवासा मागून घेतले श्वास

        डोळ्यात मोडल्या वाटा का उगा जीवाला आस

        अंगणी काजवे गाती झाडांवर पानोपानी

        स्वरसांज होऊन माझी का फिरते उदासवाणी

        मी लावून घेता दार तडफडे जीवाची वात

        काळीज फाटता माझे का उसवून गेली रात.

अशा दु:खाच्या काळोखातही उजेडाची नाती जपण्याचा अतोनात इथली स्त्री करते. प्रलोभनाचे काजवे सभोवती चमकत असतांना, स्वत:भोवतीच्या संस्काराच्या,बंधनांच्या लक्ष्मणरेषा आखून घेत अशा अनेक दु:खाच्या राती आणि दिवसांना सामोरी जाते. त्यासाठी तुळशीचे एकटेपण जगून घेते. तिचे श्वास मागून घेते. एकूणच स्त्रियांच्या जगण्यातील जी शोकांतिका आहे. ती आज वर्तमानातही म्हणावी इतकी कमी झालेली नाही. कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर स्त्रीत्वाची एक हळवी बाजू मांडत जातात. त्याचबरोबर एक दुसरी कणखर बाजू मांडतांनाही त्या दिसतात. स्त्री आणि नदीची तुलना करताना त्या लिहून जातात.

मी आदि, अनादी, निनादी कड्याकपारीतून निनादून वाहते

        तुंबून, थांबून, स्वतःचे रूप-अरूप ढवळून पाहते

        कधी मी मोहमयी, अवखळ, खोडकर संयत, संयमी तर कधी अमर्याद उर्मट

        संस्कृतीच्या सभ्यतेची समृद्धी नोंद माझ्या मर्यादांच्या काठावर

        माझे भविष्याचे आयुष्य त्यामुळेच उसळून येते लाटालाटांवर.

              मी रागी, त्यागी, तरी अभागी वाढवीत राहिले मातीमुळांचे वंशकूळ

        पण माझ्या दुःखाच्या उगमस्थानाचे कधी सापडले नाही कुणालाच मूळ

        म्हणून मी नासण्याआधीच जात आडून टाकते संपवून स्वतःला

        पात्रातल्या वाळूच्या कणाकणांत

        आणि अखंड वाहत राहते झिरपणाऱ्या झिऱ्याच्या मनात.

नदीच्या प्रतिबिंबात स्त्रीचं बिंब सामावून जातं. नदी आणि स्त्री संस्कृती संवर्धक आहेत. माणसाच्या आणि मातीच्या मुळांचे वंशकुळ संवर्धित करतात. नदी स्वत:चे अस्तित्व नष्ट करायला मागेपुढे पाहत नाही. काठांवर घाटांच्या मर्यादा आणून तिला संपवू पाहणा-या किना-यांना ती वेळप्रसंगी उद्ध्वस्त करून टाकते. हेच स्त्री शक्तीचेही बलस्थान आहे. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रात हळूहळू स्त्रिया पाय रोवून उभ्या ठाकत आहे. सासरमाहेरच्या सीमा रेषेत स्वत:ला सावरताना, चिमण्या बाळाला जोजवताना, प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यापुढे आपलं बालपण येतं. मन दुडूदुडू माहेराला पोहोचतं. आपल्या कवितेतून माहेर मांडताना त्या लिहितात-

बाळ माझं झोपताना मन माहेराला जाई

        कुठं गोठ्यातली गाय हंबरते दूर बाई

        वाजे पायातले चाळ जाग अंगणाला येई

        चांदव्याच्या चिमण्यांना डोळे त्याचे झोका देई 

        ओवी माहेराची गाते सासरच्या सुखासंग

        हात-पाय हलवीत कृष्ण माझा झाला दंग

        ऊन उगवले दारी शेणा मातीचे रे हात 

        पुन्हा तुला कशी घेऊ गाणं अंगाईचं गातं.

सत्य आणि कल्पना यामध्ये खूप अंतर असतं. त्यामुळे अप्रूप गोष्टींसाठी नेहमीच मोह अनावर होऊ शकतो. अशी मृगजळाची तहान जीव धोक्यात घालायला लावू शकते. आपण हे उघड्या डोळ्यांनी पाहत आलो आहे. म्हणूनच ऊर फाटून कोसळणाऱ्या पावसाला धरू पाहणा-यांना ओंजळीच्या मर्यादा ठाऊक असतात. नव्हे तर माहित असायला हव्यात. कोवळ्या वयाच्या पोरी पावसात आनंदाने भिजतात. इतक्या आनंदानं त्यांना भविष्यात भिजता येईल का ? त्यांचं निरागस आयुष्य थेंबासारखं विरेल का ? त्यांच्या डोळ्यातलं संसाराचं कल्पनाचित्र रांगोळीसारखं विस्कटून तर जाणार नाही ना ? असे स्त्री सुलभ प्रश्न कवयत्री डॉ.तडेगावकर यांना पडतात. तेव्हा त्या लिहितात-

परिस्थितीच्या दलदलीत राहता येईल का उभं त्यांना

        पाय रोवून सळसळत्या झाडासारखं ?

        आंब्याच्या मोहरागत दरवळेल का त्यांचं

        घरादारातलं बाईपण  ?

        की त्याही जळत धुपत राहतील चुलीपुढं,

        निमूटपणे बांधल्या जाऊन परंपरेच्या दावणीला

        चारा पाण्याच्या अभिलाषेनं

        की झटकतील मोकळ्या केसांतून

        दुर्दम्य इच्छाशक्तीनं आवळून बांधलेलं लाचार दुबळं जगणं.

समाज व्यवस्थेने स्त्रीस्वातंत्र्याला अनेक मर्यादा घातल्या आहेत. त्यांना परंपरेच्या दावणीला बांधलं आहे. हे परंपरेच्या बंधनांचं जोखड दूर सारता येईल का ? असे नानाविध प्रश्न त्यांना सतावतात. हे दुय्यमपणाचं स्थान संपलं पाहिजे. तिला खरं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. स्त्रिया आजही फाटणा-या स्वप्नांना सुई दो-याने समजूतदारपणे टाके टाकून शिवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. असे केले तरी अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत राहतात.

आघातांच्या जखमा भरून आल्या तरी

       एखादा व्रण जपतो चिघळून वाहिलेल्या वेदनेची ठणक म्हणून

       अशा आतल्या आत कुजलेल्या कितीतरी गोष्टी

       येतात उफाळून वेळी-अवेळी अस्तित्वाच्या संघर्षासाठी

       तेव्हा आपण देतो भिरकावून चिंधोट्यांचे लक्तरी क्षण

       कारण इच्छांना घेऊन आयुष्याला कधीच जिवंत ठेवता येत नाही.

असे विदारक सत्य त्यांची कविता मांडून जाते. शरीरावरच्या जखमा बुजतात पण मनावरचे व्रण चिघळून वेदनेचा ठणक जिवंत ठेवतात. दु:खाचं गाणं गात जीवनाचं जातं त्या ओढत असतात. त्यांच्या पेटत्या मनाला विझवण्यासाठी साठी, रिझवण्यासाठी कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर पावसाला विनवणी करतात.

ढग पांगले पांगले हाक पावसाला द्या रे

       दुःख पेटले भुईचे कुणी विझवाया या रे.

       आटलेल्या पाणोठ्याशी रडे तहानले ऊन

       दुःखवेणा हरिणीच्या पाणी वाहे डोळ्यातून.

       गेले दूरदेशी पक्षी गाणे मरणाचे गातं

       घास मागून सुपाचा रडे पाळूपाशी जातं.

माणूस निसर्गाचा एक घटक. या निसर्गात माणसासारखे अनेक घटक सामावलेले आहे. यातला पक्षी एक महत्त्वाचा घटक. माणसात आणि पाखरात इतका फरक का ? असा प्रश्न कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर यांना  पडतो. आणि माणसाचे तर आयुष्यभर रडगाणे थांबत नाही. जीवनातील संकटाच्यावेळी  पाखरं एकत्रपणे संघर्ष करतात. परन्तु माणसं हे एकमेकांच्या जीवावर उठतात. दोघांच्या जगण्यातला  विरोधाभास कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर यांना अस्वस्थ करतो. म्हणून त्या लिहितात-

पाखरं बांधतात घरटी झाड फांद्यांवर  पानतळ पाहून  

        माणसांच्या ही वस्त्या असतात 

        तळ्याकाठी अथवा नदीकाठावर

        थवे आणि समूहाचं नातं दोघांचंही अतूट.

        माणसांचे भविष्य चिंताग्रस्त 

        म्हणून अस्वस्थ 

        पाखरं बिनधास्त, मस्त

माणूस आणि पक्षी दोघेही समूहाचं नातं जपणारे आहेत. समुहासमूहातून राहणारे, वावरणारे आहेत. परंतु  दोघांच्या जगण्या वागण्यात फार मोठं अंतर आहे. असे का ?  पाखरं पंखांच्या उबेत वाढतात. त्यांच्या जगण्याच्या सीमा व मर्यादा  ठरलेल्या असतात. यात माणूस मात्र बंदिस्त आयुष्य जगतो. तो स्वतःभोवती मर्यादांच्या रेघोट्या ओढतो पाखरे साऱ्या ऋतूंना पचवून भयमुक्त गाणी गात बसतात. माणसाचं असं नाही. त्यातल्या त्यात स्त्रियांचं जीवन अत्यंत कठीण. संघर्ष हा तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेला. स्त्रीजीवनाचं जगणं त्या अत्यंत मार्मिक शब्दात मांडतात.
जगण्याचे जगणे जगून झाले बाई

       समजून उमजले तरी मज कळले नाही

       मागून जोगवा भरत गेली ओटी

       संपल्या दुःखाचे अश्रू दाटले पोटी 

स्त्रीजन्माची कैफियत मांडताना स्त्रीचं जगणं जगुनही कुणालाच कसं उमजत नाही. म्हणून कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर स्त्रीजन्माचा  वाट्याला आलेला आणि परंपरेने लादलेला भोगवटा भोगून पांडूरंगाकडे विनवणी करतात .

माझी विराणी मागते तुझ्या पायरीशी जागा

       दुःख होडीत सोडून वाहे माझी चंद्रभागा

       कशी जाऊ पैलतीरी बुडताना माझी नाव

       तुळशीच्या मंजुळांचा ओंजळीत भक्तिभाव

       रात्र उजळून गेली थबकला चंद्र नभी 

       तुझ्या चंदनी पायांना हात जोडून मी उभी

       टेकताना तुझ्या दारी ठेव खांद्यावरी हात

       आज गाऊ दे रे नाथा भैरवीला राऊळात

थोडक्यात स्त्रियांच्या आयुष्यात मुलगी म्हणून सुरु होणारा प्रवास अत्यंत खडतर प्रवास आहे. तिच्या उत्साही, निर्मळ मनाचा कोंडमारा होतच असतो. त्याला कोणत्याच समाजातील स्त्री अपवाद नाही. ही दमछाक सर्व स्थरावर सुरूच आहे. कुठलीही जात, धर्म, स्तर असो, कुठलंही युग असो, तिच्या शोषणाच्या फक्त पद्धती बदलल्या. नातं आणि पद कुठलंही असो ती कायम परिस्थितीपुढं दुबळी ठरते आहे. पुरुष प्रधान संस्कृतीत तिला दुय्यम स्थान दिले गेले आहे. शिक्षणानं ती जागृत झाली. कायद्याचं ज्ञान मिळालं. तरी तिचा संघर्ष न थांबता तो अधिक वाढलाआहे. पूर्वी हा संघर्ष कुटुंब आणि परिस्थितीसोबत होता. आता तो स्वत: बरोबरच आणि समाजाबरोबरही सुरु आहे. उंब-याच्या आत आणि बाहेर तिचा संघर्ष थांबलेला नाही. ती माहेरी पाहुणी तर सासरी परकी मानली जाते. दोन्ही ठिकाणी संपत्तीतून नेहमीच हद्दपार. कायद्याचे अधिकार, हक्क जरी दिले तरी आपली कुटुंबव्यवस्था कायद्यापेक्षा भावनेवर अधिक चालते. आणि हक्काची भाषा आली की संघर्ष आलाच, आणि संघर्ष म्हटलं की नात्यातील जिव्हाळा, आपुलकीचा, गोडवा संपतो. पुन्हा नव्या प्रश्नाना सामोरे जावे लागते. अशा स्त्रीमनाच्या जाणिवांचा शोध घेणारी कवयित्री म्हणजे डॉ. संजीवनी तडेगावकर होय. त्यांच्या पुढील प्रवासाला खूप शुभेच्छा.

(लेखकाशी संपर्क – ई मेल [email protected] मो.  9422757523)

 

 

 

 

 

13 COMMENTS

 1. कवयित्री संजिवनी तडेगांवकर एक अत्यंत भाऊक व नाजूक मनाच्या कवयित्री आहेत. मला नेहमीच त्यांच्या कविता भावतात.

 2. कवयित्री संजीवनी तडेगावकर मराठमोळ्या कवयित्री आहेत. त्यांच्या कविता वास्तवदर्शी व ह्रदयाला भिडणा-या असतात.

 3. डाॅ.संजीवनी तडेगावकर यांची हळूवार तरंगत फुलपाखरू, अशी शब्द ओवी होऊन येणारी एक अंथाग कारूण्याची मायाळू स्री ची गोड मार्दव लय घेऊन येणारी कविता.ही नितळ ,निरभ्र आकाशाची मनमोहक मुक्त सृजन मोरणी होऊन मनपागोळयाशी गुंतवून ठेवाणारी संपन्न संथ निर्झर
  खोल अमिट काळोखाच्या निबींट दुःखाचे प्रकाश होऊन येणारी गेय कविता. हळव्या मनाचा ठाव घेत प्रवाह पतित स्रीचं अदिम गारूड होऊन येणारी.प्रत्येक कवितेच्या ओळी एक नवी पालवी देऊन जाणारी.युगाची माता ही वेदनेच गीत गात त्या गाण्याचचं अंभग भारूड होऊन, काटेरी झूडपालाही मुक्त फुलांची आरास करणारी कविता. ज्या कवितेचा आकृतिबंध हा परिप्रेक्षात अंखड होऊन मनाला भुलवा घालतो,असं काही ही कविता लेकराला आभाळ मायेनं मातृभक्तीनं पवित्र करणारी ही कविता..

 4. संजिवनी तडेगांवकर यांच्या कविता वास्तव वादी असुन ग्रामीण समाज जिवनावर प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे त्यामुळे मला खूप भावतात.
  व ग्रामीण भागात घेऊन जातात.

 5. संजय तडेगांवकर
  कविता म्हणजे अंतर मनाला पवित्र करणारे जिवन(पाणी) तडेगांवकर मँडमच्या कविता एेकतांना स्त्रीच्या अंतर मनातील भाव ऊफाळुन येतो व डोळ्यातील आसवे जागे होतात
  माय भुमीत जन्म घेणारे हिरे मोती दुर्मिळचं त्यात एक संजीवनी वहीनी
  “धन्यवाद”

 6. जाणिवा जागृती करणारी मनाला भिडणारी कविता छानच

 7. स्त्रीचं भावविश्व प्रतिबिंबीत करणारं काव्य मनाचे वेध घेते.पण सगळ्यात महत्त्वाचा वाखण्याजोगा पैलू म्हणजे कवयित्रीच्या विचारांची प्रगल्भता उच्च दर्जाची आहे.त्यांनी शब्द केलेलं काव्य आम्हा सर्वासाठी पर्वणीच असते.

 8. मा. महाडिक सर,आपलं कवी आणि कविता हे समिक्षा सदर नवनवीन कवी कवयित्रींची ओळख करून देणारे,त्यांच्या कवितांचे विशेष दाखविणारे,कवितांची ओढ लावणारे असे आहे.आपल्या वैचारिक चष्म्यातुन वाचन केल्यास ह्या सगळ्या कविता मनाला खूप भावतात….असे वाटते की आपली खूप जुनी मैत्री आहे या साऱ्यांशीचं…..एकदम जवळची होऊन जातात सगळी…. डॉ.संजीवनी तडेगावकर ….. यांच्याविषयीसुद्धा एक अशीचं जवळीक साधल्यासारखं वाटलं….त्यांच्या प्रत्येक कवितेतील भाव मनाला स्पर्शून गेला…..त्यांच्या आवाजातील अस्वस्थ किनाऱ्यावरचे भाव मनात अगदी खोलवर झिरपले…. समस्त स्त्रीवर्गाच्या भावना थोड्याफार फरकाने अशाच….. त्यामुळे हे सारं आपलंच असं नक्कीच वाटून गेलं….
  सर,असेचं लिहीत रहा…..आपल्या पुढील सदराच्या प्रतिक्षेत…..
  दीपाली कळवणकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here