इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘झी मराठी’वरील ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका सध्या यशाच्या शिखरावर आहे. या मालिकेत अभिनेत्री शिल्पा तुळसकर आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भलतीच आवडली आहे. चाळिशीतील त्यांचं हे प्रेम आहे. विविध ट्विस्ट आणि वेगळ्या धाटणीची मालिका म्हणून अल्पवधीत या मालिकेने प्रेक्षकांची माने जिंकली आहेत. या मालिकेत स्वप्निल आणि शिल्पामधील एक इंटिमेट सीन दाखवण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत शिल्पा तुळसकरने याबाबत आपल्या भावना मांडल्या आहेत.
‘तू तेव्हा तशी’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. मोठ्या पडद्यावरील स्टारकास्ट या मालिकेत असल्याने तसेच वेगळ्या धाटणीची मालिका असल्याने प्रेक्षकांना ही मालिका भावली आहे. सौरभ आणि अनामिका यांच्यातील संबंध सुधारत असतानाच अचानक अनामिकाच्या नवऱ्याची एंट्री झाली. यामुळे परिस्थिती गंभीर झाली. त्यामुळे आता ही अधुरी प्रेमकहाणी पूर्ण कशी होणार याची उत्सुकता ताणली गेली होती. आता अशोक समर्थ जेलमध्ये गेला आहे. त्यामुळे सौरभ – अनामिका पुन्हा जवळ येत आहेत. स्वप्निल आणि शिल्पामधील इंटीमेट सीन दाखवण्यात येत आहे. अभिनेत्री शिल्पा तुळसकरने एका मुलाखतीत यावर थेट भाष्य केलं आहे.
चित्रीकरणानिमित्त एखादा अभिनेता आणि अभिनेत्री सतत एकत्र असताना प्रेमात पडणं असं कधी घडलं आहे का ? या प्रश्नावर शिल्पा म्हणते, “स्वप्निल जोशीबाबतच मी सांगते. स्वप्निलबरोबरच माझे खूप छान आणि इंटिमेट सीन असतात. छान म्हणतेय कारण खूप सुंदररित्या ते चित्रीत केले जातात.” इथे माझ्या सहकलाकारांना त्याचं श्रेय द्यायला हवं. स्त्रीला स्पर्शामधूनच कळतं की इथे काय गडबड आहे. जर सीन करताना माझ्या सहकलाकाराला काहीही वाटलं असेल तरी ते त्याने माझ्या पर्यंत पोहचू दिलं नाही. हेच खूप कठीण काम आहे. जसं मी काम करते तसं काम माझा सहकलाकारही करतो. आपण सुशिक्षित आणि समजूतदार आहोत. त्या पद्धतीनेच काम करत असतो. जर आपण आपल्या वागण्यावर मर्यादा घातल्या नाहीत तर प्रत्येक सेटवर तुम्हाला प्रेम होणार आणि मग तुमचा प्रेमभंग होईल.”, असे ती म्हणाली.
शिल्पा पुढे म्हणाली की, स्वप्निल आणो मी एक सीन करत होतो. जिथे आमच्या दोघांचं एकमेकांच्या डोक्याला डोकं आणि नाकाला नाक टेकतं. आमच्या दोघांमध्ये फक्त श्वासाचं अंतर आहे. आमच्या बरोबर बाजूला थर्माकॉल घेऊन एक तिसरा माणूस उभा आहे जो आमच्या दोघांपासून श्वासाच्या अंतरावर आहे. हा सीन चित्रित करत असताना मध्येच स्वप्निल म्हणाला, ऐकना मला असं वाटतं की, आपल्या तिघांचं अफेअर आहे. आणि स्वप्निलच्या या वाक्यावर अचानक वातावरण हलकं झालं. खरंतर अशाप्रकारचे सीन चित्रीत करणं दिग्दर्शकासाठी मोठं आव्हान असतं. सेटवर कोणाबरोबर तरी अफेअर होणं हे वाटतं तितकं ते सोपं नाही. तर स्वप्नील अप्रतिम आहे, तो सगळ्या गोष्टी हातात घेऊन करतो, तो रोमान्सचा किंग आहे असे स्वप्नील जोशींचे कौतुक देखील शिल्पाने केले. सध्या या मालिकेत या दोघांची रंगलेली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तेव्हा आता मालिकेत अजून कोणती वळणे येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Actress Shilpa Tulaskar on Marathi TV Serial
Entertainment