नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जवळपास सात वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीला सरकारने अखेर हिरवा कंदील दाखविला असून भरती संदर्भातील वेळापत्रक प्रशासनाला प्राप्त झाले आहे. सरकारच्या निर्णयामुळे २,६१८ रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून पुढील वर्षात भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
जिल्हा परिषदेत वर्ग तीन आणि चारची पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला आणि सरकारला सगळीच कामे बाजूला ठेऊन या संसर्गजन्य आजाराशी झुंजावे लागले. त्यामुळे भरतीचा विषय मागे पडला होता. देवेन्द्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नोकर भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असतानाच लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे भरतीचा पुढील टप्पा आचारसंहितेच्या कचाट्यात अडकला. उमेदवारांकडून भरतीविषयी विचारणा सुरु होती. शिंदे सरकारच्या काळात मात्र या रखडलेल्या भरतीला मुहूर्त लागला असून यासंदर्भातील आदेश नुकतेच काढण्यात आले आहे.
असे आहे वेळापत्रक
* बिंदू नामावली, आरक्षण अंतिम करणे -३१ जानेवारी २०२३ पर्यंत
*जाहिरात प्रसिद्ध करणे -१ ते ७ फेब्रुवारी
*अर्ज मागविणे -८ ते २२ फेब्रुवारी
*अर्ज छाननी करणे-२३ फेब्रुवारी ते १ मार्च
* पात्र अर्जाची यादी जाहीर करणे- २ ते ५ मार्च
* परीक्षा आयोजनाबाबत कार्यवाही -६ मार्च ते ५ एप्रिल
* पात्र उमेदवारांचे प्रवेश पत्र तयार करणे अन उपलब्ध करून देणे-६ ते १३ एप्रिल
*परीक्षा घेणे-१४ ते ३० एप्रिल
* निकाल जाहीर करून नियुक्ती पत्र देणे -१ ते ३१ मे
त्या भरतीचे काय
यापूर्वी जेव्हा भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली होती अन त्यात ज्यांनी अर्ज केले होते त्या उमेदवारांबाबत सरकारने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे या उमेदवारांना पुन्हा नव्याने अर्ज करावे लागणार आहे. पण त्यांनी त्यावेळी भरलेल्या शुल्काचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
Nashik Jilha Parishad Recruitment Government