नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे येथील वृध्दाचे गडकरी चौक ते गोविंदनगर दरम्यान अॅटोरिक्षा प्रवासात पाच लाख रूपये चोरट्यांनी लंपास केले. वृध्दाचे लक्ष नसल्याची संधी साधत सुटकेस उघडत ही रक्कम चोरल्याचे समोर आले आहे. या चोरीप्रकरणी श्रीकृष्ण लक्ष्मणराव झुंजारराव (७९ रा.हिंजवडी,पुणे) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झुंजारराव हे गेल्या बुधवारी (दि.९) शहरात दाखल झाले होते. रात्रीचा प्रवास करून ते सकाळी बसमधून गडकरी चौकात उतरले होते. गोविंदनगर येथे जाण्यासाठी ते प्रवासी वाहतूक करणा-या अॅटोरिक्षात बसले असता ही घटना घडली. दोन प्रवासी असलेल्या रिक्षातून त्यांनी गोविंदनगर येथील सत्यम स्विट दरम्यान प्रवास केला. अज्ञात चोरट्यांनी त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधत सुटकेस उघडून कपड्यांखाली ठेवलेली कापडी पिशवी चोरून नेली. या पिशवीत पाच लाख रूपयांची रोकड होती. ही बाब नातेवाईकांच्या घरी जावून झुंजारराव यांनी सुटकेस उघडली असता समोर आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.