नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला नाशिक सहकारी साखर कारखाना ज्या धर्तीवर जिल्हा बँकेने चालविण्यास दिला होता त्याच धर्तीवर आज जिल्हा बँक प्रशासनाकडून निफाड सहकारी साखर कारखाना चालविण्यास देण्याविषयी आलेल्या निविदा ओपन करण्यात आल्या. जिल्हा बँकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेत प्रख्यात बी.टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रा. लि. ही कंपनी अव्वल आल्याने त्यांची निविदा मंजूर करण्यात आली आहे.यामुळे साखर कारखाना सुरु होण्याचा मार्ग आता निकाली निघाला आहे.गेल्या दहा वर्षांपासून बंद पडलेला कारखाना आता सुरू होणार असल्याने निफाड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निफाड सहकारी साखर कारखान्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून गेल्या १५ वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न झाल्याने गेल्या दहा वर्षांपूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखान्याचा ताबा घेतला होता. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून निफाड सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेमध्ये होता. कारखाना सुरू व्हावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू होते.कारखाना सुरू व्हावा यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून यापूर्वी अनेकदा आंदोलनेही झालेली आहेत. परंतु बँकेचे कर्ज असल्याने कारखाना सुरू होण्यास अनेक अडथळे होते. राजकीय पक्षांचे पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तगाद्यामुळे जिल्हा बँकेने निफाड सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यात देण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला होता.
मागील काही महिन्यांपासून जिल्हा बँक प्रशासनाकडून साखर कारखाना भाड्याने देण्या विषयीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.बँक प्रशासनाने या विषयीची जाहिरात देत टेंडर प्रक्रिया सुरू केली होती.या अनुषंगाने पाच मक्तेदारांनी निवेदा प्रक्रियेत भाग घेतला होता.जिल्हा बँक प्रशासनाकडून आज सायंकाळी निवेदा प्रक्रिया उघडण्यात आली.या प्रक्रियेमध्ये चार मक्तेदार मागे पडले असून नाशिक शहरातील प्रसिद्ध बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रा.लि. ही कंपनी निविदा प्रक्रियेत अव्वल आल्याने सदर निविदा मंजूर करण्यात आली आहे.यामुळे साखर कारखाना सुरु होण्याचा मार्ग आता निकाली निघाला आहे.निविदा मंजूर झाल्याने आता पुढील २५ वर्ष निफाड सहकारी साखर कारखान्याची सूत्रे बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रा.लि.या कंपनीकडे जाणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
Niphad Sugar Factory Tender Approved Nisaka