सिटी लिंक बसमधून महिलेच्या पर्समधील रोकड, दागिने चोरटयांनी केले लंपास
नाशिक : निमाणी ते औरंगाबाद नाका दरम्यान सिटी लिंक बसमधून प्रवास करीत असतांना महिलेच्या पर्समधील रोकडसह दागिने चोरटयांनी लंपास केले. या चोरीप्रकरणी सुनिता परमेश्वर बन (रा.सात माऊली चौक,श्रमिकनगर) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बन या शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास औरंगाबाद नाका भागात राहणा-या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असतांना ही घटना घडली. निमाणी बस डेपो येथून त्या सिटी लिंक बसमध्ये बसल्या होत्या. औरंगाबादनाका दरम्यानच्या प्रवासात अज्ञात चोरट्यांनी गर्दीची संधी साधत त्यांच्या पर्सची चैन उघडून आतील दहा हजाराची रोकड व तीन तोळे वजनाची सोन्याची पोत असा सुमारे ६० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेली. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.
सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी ओरबाडली
नाशिक : चेहडीपंपीग भागात चौकात गप्पा मारत उभ्या असलेल्या महिलांपैकी एकीच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीबाई अशोक गायकवाड (६२ रा.हनुमान चौक,चेहडीपंपीग) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गायकवाड या शुक्रवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास आपल्या सुनेस सोबत घेवून कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. भगवा चौकातून सासू आणि सून जात असतांना वाटेत सासूची मैत्रीण शैला शिरोळे या त्यांना भेटल्या. तिन्ही महिला एस.आर.सलून समोरील रस्त्यावर गप्पा मारत उभ्या असतांना ही घटना घडली. हनुमानचौकाकडून आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने गायकवाड यांच्या गळ््यातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीचा सोन्याचा गोफ असलेली पोत हिसकावून घेत भगवा चौकाच्या दिशेने पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गणेश शेळके करीत आहेत.