इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही मनुष्याच्या जीवनात इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर काही मिळवण्याची ताकद असते आणि त्याला यश नक्कीच मिळते, असे म्हटले जाते मग त्या जिद्दीला वय देखील आडवे येऊ शकत नाही. अगदी 94 वर्षाच्या वृद्ध महिलेने हे आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखविले आहे. एका आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत या महिलेने यश मिळून सर्वांनाच आश्चर्यचिकित केले आहे.
आजकाल तरूणांप्रमाणेच वद्धांमधील काहीतरी क्रिएटीव्ह करण्याची इच्छाशक्ती अधिक असल्याचे दिसून येते. कोणतंही चांगलं काम करण्यासाठी वयाचे बंधन नसते. असेच एक उदाहरण म्हणजे 94 वर्षांच्या भगवानी देवी डागर. त्यांनी चक्क या वयात फिनलंडमध्ये सुरू असलेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022’ स्पर्धेमध्ये 100 मीटर स्प्रिंट म्हणजेच वेगात चालण्याच्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या आजीबाईंच्या या अनोख्या कामगिरीमुळे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
भगवानी देवी यांनी 100 मीटर अंतर 24.74 सेकंदात पार केले. विशेष म्हणजे या आजींनी गोळाफेक प्रकारातही सहभाग घेतला होता. यातही त्यांनी कांस्यपदक पटकावले. सोशल मीडियावर त्यांच्या या कामगिरीचे खूप कौतुक झाले होते, त्याचप्रमाणे भगवानी देवींचा नातू विकास डागर हा देखील पॅराअॅथलीट असून त्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता त्याची आजी भगवानी देवींनी पदके जिंकून विक्रम केला आहे.
विशेष म्हणजे चेन्नईमध्ये झालेल्या नॅशनल मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतही भगवानी देवींनी तीन सुवर्णपदके जिंकली होती. या कामगिरीच्या बळावर त्यांनी वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश मिळवला. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर भगवानी देवींचा फोटो पोस्ट करून त्यांचे कौतुक केले आहे. मंत्रालयानं त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘भारतातील 94 वर्षीय भगवानी देवी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की वय फक्त एक आकडा आहे. त्यांनी सुवर्ण आणि कांस्यपदके जिंकली. ही खरोखर साहसी कामगिरी आहे.’ आता या आजीबाई आणखी कोणता विक्रम करतात, याचीही चर्चा सुरू आहे.
94 year old Women won Gold medal in World Masters Athletics championship