हैदराबाद – तेलंगणच्या नगरकुरनूल जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यक्तिने अटक होण्याच्या भीतीने लाच देण्यासाठी जमा केलेले पैसे चक्क जाळून टाकले. ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात संबंधित व्यक्तिला तहसीलदारांनी पाच लाखांच्या नोटा जमा करण्यास सांगितले होते. परंतु लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या भीतीने त्याने ते पैसे कथितरित्या जाळून टाकले. त्यामुळे या प्रकाराची देशभरात जोरदार चर्चा होत आहे.
एकूण पाच लाख रुपयांमधील २ हजारांच्या ४६ नोटा म्हणजेच ९२ हजार रुपये पूर्णपणे जळून राख झाले. तर ५०० आणि दोन हजारांच्या काही नोटा अर्धवट जळाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका अधिकार्याने सांगितले.
एसीबीच्या अहवालानुसार, वेलडंडा विभागाच्या तहसीलदारांनी एका व्यक्तिला त्याच्या घरी पाच लाख रुपये लाचेच्या स्वरूपात एकत्रित करण्यास सांगितले होते. संबंधित व्यक्तिला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती.
तक्रारदाराला खाणीच्या परवान्यासाठी ना हरकत प्रमाणपत्राची गरज होती. ते त्याला संबंधित विभागाला द्यायचे होते. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर एसीबीने चौकशी सुरू केली आहे. एसीबीच्या छाप्याबाबत माहिती मिळाल्यानंतर व्यक्तिने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि पकडल्या जाण्याच्या भीतीने स्वयंपाक घरातील गॅस पेटवून सर्व नोटा जाळल्या. या घटनेनंतर एसीबीला अर्धवट जळालेल्या काही नोटा मिळाल्या. या प्रकरणी एसीबीने तहसीलदारांना ताब्यात घेतले आहे. एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे.