नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २०१४ पासून केंद्रीय तपास योजनांचा गैरवापर वाढल्याचा आरोप सातत्याने होत आहे. राजकीय हेतूने कारवाई करण्यात येत असल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील विरोधी पक्षातील नऊ मोठ्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत केंद्रीय तपास यंत्रणचा गैरवापर थांबविण्याची मागणी केली आहे.
सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणेच्या कार्यशैलीवर विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदविला आहे. राजकीय महत्त्व लक्षात घेऊन कारवाई होत असल्याचेही म्हटल्या जात आहे. पत्रातील मजकुरानुसार, विरोधी पक्षातील जे नेते भारतीय जनता पार्टीत सहभागी होतात त्यांच्याविरोधात तपास यंत्रणांची कारवाई संथगतीने जाते. राज्यपाल कार्यालय लोकशाहीरितीने निवडून आलेल्या सरकारच्या कामात हस्तक्षेप करते. राज्यपाल हे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील दरी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिमा मलिन होत आहे, हे खूप चिंताजनक असल्याचा दावा विरोधी पक्षाने केला आहे.
या पत्रावर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुला यांची सही आहे.
सिसोदियांवरील कारवाईचा उल्लेख
२६ फेब्रुवारीला झालेल्या चौकशीनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली. त्यांच्या अटकेचे ठोस पुरावेही नाहीत, असे म्हणत आजवरच्या कारवायांमध्ये प्रामुख्याने विरोधी पक्षातील नेत्यांचाच समावेश असल्याचे पत्रात म्हटले आहे.
9 Opposition Leaders Letter to PM Modi