पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आठ वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे. विशेष म्हणजे हा चिमुकला मोबाईलवर हिंसक चित्रपट पाहत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सीन रिक्रिएट करण्यासाठी कदाचित जीवघेणे पाऊल उचलले असावे, असे सांगितले जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने बाहुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, बाहुलीचे डोके कापडाने झाकलेले आहे.
पिंपरी चिंचवडमधील थेरगाव परिसरात ही घडली असून काळजाच्या तुकड्याला पालकांचा श्वास रोखला गेला. पोलिसांनी माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. ही घटना रविवारी घडली. मुलाने हे पाऊल उचलले त्यावेळी मुलाचे आई – वडील कामावर गेले होते आणि त्याचे भावंडं घराबाहेर खेळत होते. मुलाचे वडील वॉचमन म्हणून काम करतात आणि आई अनेक घरात घरकाम करते.
पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांनी याबाबत सांगितले की, जेव्हा आई कामावरून परतली तेव्हा त्यांना मुलगा लटकलेला दिसला. शेजारी एक बाहुली पडली होती. बाहुलीचा दोरीने गळा दाबून खून करण्याचा प्रकार तो करत असावा असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तिचे डोके कापडाने झाकले गेले असल्याने हा तर्क पोलिसांनी लावला आहे. पुढे ते म्हणाले, “आतापर्यंतच्या तपासात मुलाने बाहुलीचा गळा दाबून आत्महत्या केली असावी, असे दिसते. कुटुंबातील सदस्यांनी आम्हाला सांगितले की, तो आपला जास्तीत जास्त वेळ फोनवर व्हिडिओ पाहण्यात घालवत असे. कुटुंबावर अजूनही हादरा बसला आहे. आम्ही कुटुंब आणि त्याला चांगले ओळखणाऱ्या लोकांशीही बोलू.”
हिंसक चित्रपट बघायचा..
घटनेच्या प्राथमिक तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मुलाने ज्या खोलीत हे कृत्य केले तिथे एक बाहुली आढळून आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी, त्याने चित्रपटाचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी दोरीने बाहुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. बाहुलीच्या चेहऱ्यावर कापडही होतं. तो अनेकदा हिंसक आणि आत्महत्येस प्रवृत्त करणारे चित्रपट पाहत असे, असे कुटुंबियांनी चौकशीत सांगितले आहे.