मुंबई – कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कित्येकांचे संसार उध्वस्थ झाले. लाखोंना रोजगाराचे नवे मार्ग निवडावे लागले. पण अश्या परिस्थितीतही सरकारी नोकरीची जणू जत्राच आयोजित करण्यात आली आहे, एवढ्या जागा निघालेल्या आहेत. विविध सरकारी कार्यालयांमधील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. कोरोना संक्रमणाचा प्रभाव कमी झाल्यावर सरकारने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सरकारी नोकरी प्राप्त करणे अवघड आहे असे नाही, मात्र त्यासाठी जिद्द आणि मेहनतीची तयारी आवश्यक आहे. त्याचवेळी योग्य संधीची माहिती असणेही आवश्यक आहे.
बीएसएफ एअर विंगमध्ये भरती
सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)ने अधिसूचना जारी करून भरतीची घोषणा केली आहे. ग्रुप ए, बी आणि सीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. यात कॅप्टन, पायलट (डीआयजी), कमांडेट (पायलट), उपअभियंता, वरीष्ठ एअरक्राफ्ट मेन्टनन्स अभियंता, ज्युनियर अभियंता, अधिकारी, निरीक्षक, गनर आदी पदे रिक्त आहेत.
पश्चिम बंगाल पोस्टल सर्कल
पश्चिम बंगालच्या पोस्टल सर्कलमध्ये जीडीएस पदांची भरती होणार आहे. बंगालमधील भारतीय डाक सेवा विभागाने ग्रामीण डास सेवक (जीडीएस)च्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना काढलेली आहे. त्यासाठी कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे वयाची व्यक्ती अर्ज करू शकणार आहे. दहावी उत्तीर्ण व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकणार आहे. यासोबतच कमीत कमी 60 दिवसांचा बेसिक संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्रही आवश्यक आहे.
2300 पेक्षा अधिक नोकऱ्या
इंडिया पोस्ट जीडीएस भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून कुठल्याही विषयात पदवी करणाऱ्यांला भारतीय डाक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.appost.in) जाऊन आनलाईन अर्ज करता येणार आहे.निवड झालेल्या उमेदवारांना कमी कमी 14 हजार रुपये वेतन दिले जाणार आहे.
आयकर विभागात भरती
आयकर विभागाने मल्टी टास्किंग स्टाफ, आयकर निरीक्षक आणि टॅक्स असिस्टंटच्या 155 पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी केली आहे. दहावी पास ते पदवीप्राप्त उमेदवारांपर्यंत कुणीही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. मुख्य म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना 56 हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
भारतीय रेल्वेतही संधी
भारतीय रेल्वेने अपरेंटिसशीपलाठी 1 हजार 664 पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार www.rrcpryi.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. निवड झालेल्यांना विविध प्रशिक्षण सत्रांमधून तयार केले जाईल.