कानपूर (उत्तर प्रदेश) – देशात पोलिस दलावर नागरिकांचे संरक्षण करण्याची तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी असते. परंतु रक्षणकर्तेच भक्षक झाले तर देशातील नागरिकांनी कोणाकडे न्याय मागण्यास जावे हा प्रश्न पडतो. उत्तर प्रदेशातील न्यायालयाने पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर एक प्रकरण समोर आले आणि पोलिस दलात एकच खळबळ उडाली.
गुन्हे शाखेत तैनात असलेल्या आठ पोलिसांविरुद्ध कानपूरच्या काकादेव पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी रेस्टॉरंट मालक मयंक सिंह यांनी संशयित पोलिसांवर त्यांचे अपहरण आणि मारहाण करून ४० लाख रुपये लंपास केल्याचा आरोप केला आहे.
शास्त्रीनगर येथील रहिवासी मयंक सिंह बीबीएचा विद्यार्थी आहे. तो एका रेस्टॉरंटचा मालक आहे. २४ जानेवारी रोजी मयंक आपल्या मित्रासोबत काकादेव येथील एका चहाच्या हॉटेलवर गेला होता. त्यादरम्यान काही जण त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून घेऊन गेले होते. त्याला कारमधून लखनऊच्या कँट पोलिस ठाण्यात नेण्यात आले. मयंकचे मामा दुर्गा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याला कारमध्ये जबरदस्तीने बसवणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून गुन्हे शाखेत तैनात असलेला पोलिस निरीक्षक रजनिश वर्मा होते, असे त्याचे म्हणणे आहे. मयंक आणि त्याच्या मामाला ताब्यात घेतल्याचे कारणही सांगितले नाही.
पोलिस निरीक्षक रजनिश वर्मा यांनी मयंकचे दुसरे मामा विक्रम सिंह यांना फोन करून ४० लाख रुपये देण्याची मागणी केली. इतकी मोठी रक्कम देण्यास विक्रम सिंह यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे त्यांना पोलिस ठाण्यात बंधक बनवण्यात आले. मयंकच्या माहितीनुसार, मामा दुर्गा यांना पोलिस कर्मचारी कल्याणपूर येथे घेऊन गेले होते. पोलिसांनी दुर्गा यांच्या घरातून ३० हजार रुपये आणि सव्वा लाख रुपयांचे दागिने लुटले. तसेच नातेवाईक अजय सिंह यांच्याकडून आरोपी पोलिस कर्मचार्यांनी ४० लाख रुपये खंडणी वसूल केली.
फिर्यादी मयंकच्या माहितीनुसार, पोलिस कर्मचार्यांनी त्याला गोमतीनगर येथील पोलिस ठाण्यात एका प्रकरणात अडकवले होते. पीडिताच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या अत्याचाराविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पोलिस निरीक्षक रजनिश वर्मा यांच्यासह आठ पोलिस कर्मचार्यांविरुद्ध मारहाण आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.