इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील मोसाळे होसळी गावात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान एका टँकरने धडक दिल्याने ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात २० जण गंभीर जखमी झाले आहे. यातील १० हून अधिक जणांची स्थिती चिंताजनक आहे. हासन – म्हैसूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. रस्त्याच्या एका बाजूला मिरवणूक होती. दुस-या बाजूला वाहतूक सुरु होती. दुभाजक तोडून रस्त्याच्या एका बाजूने टँकर आला होता. हजारो लोकांच्या मिरवणुकीत टँकरने दिली. त्यात ८ जणांचा मृत्यू झाला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विट करत म्हटले आहे की, हासन येथे गणेश विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकीला एका लॉरीने धडक दिल्याने अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आणि २० हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची बातमी ऐकून खूप दुःख झाले. मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. सरकारच्या वतीने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. या घटनेत जखमी झालेल्यांच्या वैद्यकीय खर्चाचाही सरकार भार उचलेल. या दुर्घटनेत बाधित झालेल्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण सर्वजण उभे राहूया.
हसनच्या उपायुक्त केएस लता कुमारी यांनी सांगितले की, ८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २२ जण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर केआयएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. एका खाजगी रुग्णालयात सात जणांवरही उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती सामान्य असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचे नेमके कारण काय आहे याबद्दल पोलिसांनी अद्याप माहिती दिलेली नाही. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, मिरवणूक पुढे जात होती, त्यात मोठ्या संख्येने तरुण सहभागी होते. असे म्हटले जात आहे की ट्रक दुभाजकाला धडकला. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते असे वृत्त आहे आणि याबद्दलची माहिती अद्याप मिळणे बाकी आहे.