मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
एक एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. करसंदर्भातील नियमांमध्ये बदल होणार असल्याने तुमच्या गुंतवणूकीवर परिणाम होणार आहे. यामध्ये क्रिप्टोकरन्सीपासून पीएफच्या योगदानापर्यंतच्या कराचा समावेश आहे. तसेच दिव्यांग मुलांच्या पालकांना करामधून सवलत मिळणार आहे. करसंदर्भातील नियमांमध्ये होणाऱ्या बदलांबाबत आपण जाणून घेऊया.
क्रिप्टोकरन्सीचा नियम
क्रिप्टोकरन्सीत केलेल्या गुंतवणुकीत नुकसान झाल्यास त्याच्या भरपाईबाबत केंद्र सरकारने कोणताच पर्याय दिलेला नाही. समजा, एका क्रिप्टोमध्ये तुमचा फायदा आणि दुसऱ्यामध्ये नुकसान झाले असेल, तर शेअर्सप्रमाणे यामध्ये तुम्हाला भरपाईचा लाभ मिळणार नाही.
उदाहरणार्थ, जर तुम्ही बिटकॉइनवर एक हजार रुपयाचा नफा कमावला असेल आणि एथेरियमवर ७०० रुपयांचे नुकसान झाले असेल, तर तुम्हाला ३०० रुपयांच्या नफ्यावर नव्हे, एक हजार रुपयांवर कर द्यावा लागेल. त्याशिवाय शेअर, म्युच्युअल फंड किंवा बांधकाम क्षेत्रातील नुकसान भरपाईचा लाभ क्रिप्टोवर घेता येणार नाही.
अपडेटेड आयटीआर सुविधा
प्राप्तिकर विभागाने आयटीआरमध्ये नवीन सुविधा दिली आहे. त्याअंतर्गत एका नव्या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे. या सुविधेनुसार प्राप्तिकराचा भरणा करताना झालेल्या त्रुटी किंवा चुकांमुळे अद्ययावत (अपडेटेड) रिटर्न दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. करदाते आता निर्धारित वर्षाअखेरच्या दोन वर्षांच्या आत एक अपडेटेड रिटर्न दाखल करू शकणार आहेत.
राज्य कर्मचाऱ्यांना सवलत
राज्य सरकारी कर्मचारी आता नियोक्तातर्फे मूळ वेतन आणि महागाई भत्ता १४ टक्क्यांपर्यंत एनपीएस योगदानासाठी कलम ८० सीसीडी (२) अंतर्गत कपातीचा दावा करू शकणार आहेत. ही कपात सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या अनुरूप आहे. आता सर्व राज्य सरकारी कर्मचारी १२ टक्क्यांपर्यंत दावा करू शकतील.
पीएफ खात्यावर कर
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डा (सीबीडीटी)ने एक एप्रिलपासून प्राप्तिकर (२५ वे संशोधन) नियम २०२१ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत ईपीएफमध्ये वार्षिक २.५० लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीच्या करसवलतीचा दावा करू शकतात. त्याहून अधिक गुंतवणूक केल्यास त्याच्या व्याजावर कर लागेल.
कोरोना उपचारावरील खर्चावर दिलासा
जून २०२१ रोजीच्या निवेदनानुसार, कोविड उपचारासाठी पैसे मिळालेल्या लाभार्थ्यांना करामधून सवलत देण्यात आली आहे. तसेच कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मिळालेल्या १० लाखांच्या आर्थिक मदतीवर करसवलतीचा लाभ मिळेल. मृत्यूच्या तारखेपासून १२ महिन्याच्या आत मदत मिळालेल्या कुटुंबातील सदस्यांना हा लाभ मिळेल.
दिव्यांग मुलांच्या पालकांना सवलत
प्राप्तिकर नियमांमध्ये दिव्यांग व्यक्तीच्या आई-वडिलांना देण्यात येणाऱ्या करसवलीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग मुलांच्या आई-वडील किंवा पालकांना विमा पॉलिसीवर करसलवतीचा लाभ मिळू शकणार आहे.