इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानमध्ये एका ७० वर्षीय महिलेने मुलाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर तब्बल ५४ वर्षांनी या महिलेच्या घरी पाळणा हलला आहे. IVF तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या महिलेला मूल झाले आहे. घरात मूल जन्माला आल्याने तिचा ७५ वर्षांचा पती आणि कुटुंबातील इतर सदस्य प्रचंड आनंदात आहेत. IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर संस्थेचे वैज्ञानिक संचालक आणि भ्रूणशास्त्रज्ञ डॉ. पंकज गुप्ता यांनी सांगितले की, चंद्रावती आणि तिचे पती गोपी सिंह हे झुंझुनूजवळील हरियाणा सीमेवरील सिंघाना गावचे रहिवासी आहेत.
यापूर्वी त्यांनी मोठ्या महानगरांमध्ये उपचार घेतले होते पण यश आले नव्हते. त्यानंतर ते अलवरला आले. महिलेने 2 वर्षांपूर्वी तिच्यावर उपचार सुरू केले होते आणि त्यानंतर IVF प्रक्रियेच्या तिसऱ्या प्रयत्नात ती गर्भवती झाली. देशभरात या वयात मुले जन्माला येण्याची काही मोजकीच प्रकरणे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. राजस्थानातील हे बहुधा पहिलेच प्रकरण असावे. जेव्हा ७५ वर्षांच्या पुरुषाला आणि ७० वर्षाच्या स्त्रीला मूल झाले आहे.
चंद्रावती यांचे पती गोपी सिंह हे निवृत्त सैनिक असून, त्यांना लष्करातून निवृत्त होऊन ४० वर्षे झाली आहेत. बांगलादेशच्या युद्धात गोपी सिंह यांनी कामगिरी बजावली आहे. आज त्यांना पुत्रप्राप्ती झाल्याने त्यांना आनंदाची भेट मिळाली आहे. गोपीचंद यांच्या घरात ५४ वर्षांनंतर मुलगा झाल्याच्या आनंदाने घरात चमक आली आहे.
माजी सैनिक गोपीचंद हे देखील त्यांच्या वडिलांचे एकुलते एक पुत्र आहेत. गोपीचंद यांनी सांगितले की ते त्यांचे वडील नेनू सिंह यांचा एकुलता एक मुलगा आहे. लग्नानंतर त्यांना मुलबाळ नसल्याने घरचे निराश होते. त्यांनी आपल्या पत्नीवर देशभरातील मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेतले होते, पण त्यांना यश आले नाही. अखेर ५४ वर्षांनंतर त्यांच्या पत्नीने अलवरमध्ये मुलाला जन्म दिला आहे. बाळ २ किलो ७५० ग्रॅम वजनाचे आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळाची प्रकृती उत्तम आहे.
इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) पूर्वी टेस्ट ट्यूब बेबी म्हणून ओळखले जात असे. या उपचारात स्त्रीची अंडी आणि पुरुषाचे शुक्राणू यांचे मिश्रण केले जाते. जेव्हा गर्भ तयार होतो, तेव्हा तो स्त्रीच्या गर्भाशयात ठेवला जातो. ही प्रक्रिया खूपच किचकट आणि महागडी आहे, परंतु जे अनेक वर्षांपासून गर्भधारणेचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हे अक्षरशः वरदान आहे.
70 Year Old Women given Birth to Child
Rajasthan