अजय सोनवणे, इंडिया दर्पण
नाशिक जिल्हयातील सर्वात मोठ्या क्षमतेच्या गिरणा धरणात पाण्याचा साठा वाढू लागला आहे. २१हजार ५०० दक्षलक्ष साठवण क्षमता असणा-या या धरणात सध्या १८,५०० दक्षलक्ष पाणी साठा झाला आहे. जिल्हयातील कळवण,बागलाण या क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने गिरणा आणि मोसम या दोन्ही नद्यांना पूर आल्याने त्याचे पाणी गिरणा धरणात जात आहे. त्यातच आज बागलान मधील केळझर धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागल्याने आरम नदी भरुन वाहू लागल्याने ते पाणी आता ठेंगोडा बंधा-यात जाऊन पुढे गिरणा नदीत वाहणार असल्याने गिरणा धरणाच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील पावसाळ्याचे काही दिवस पाहता धरणातील पाणी साठा जर ८० टक्क्याच्या जवळ पोहचल्यास गिरणा धरणातून पाणी सोडण्यात यावे लागेल अशी शक्यता अभियंता हेमंत पाटील यांनी व्यक्त केली. गिरणा धरणातील पाण्यावर नांदगाव तालूक्यातील ४२ खेडी पाणी योजना,मालेगाव शहर,तालूक्यातील पाणी योजनांना पाणी पुरवठा होतोच शिवाय हे पाणी जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरत असून तीन वर्षा पासून धरण भरत असल्याने यंदा गिरणा धरण कधी लवकर भरेल याकडे सर्वांच लक्ष लागलेले आहे.