इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – बिहार राज्यातल्या पश्चिम चंपारणमधील बगाहा जिल्ह्यात एका सरकारी शिक्षकाने निरपराध विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली. ज्यामध्ये तिची तब्येत इतकी बिघडली की तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. शिक्षकाच्या मारहाणीमुळे मुलगी प्रचंड घाबरली आहे. त्यामुळे ती शाळेत जाण्याच्या विषयानेही हादरते आहे.
बगाहा जिल्ह्यात शासकीय प्राथमिक शाळा नवका टोला पिप्रहिया नावाची शाळा आहे. जिथे शिक्षकाने शाळेतील इयत्ता दुसरीत शिकणारी सुफिया शाहिद हिला बेदम मारहाण केली. तिच्या संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या आहेत. हे प्रकरण गेल्या मंगळवारी घडले. या मुलीची आई जुमनी खातून हिने पोलिस ठाण्यात याविषयी तक्रार केली. त्यांच्या अर्जावर पोलीसांनी एफआयआर नोंदवली असून तपास सुरु आहे.
जखमी मुलीचे वडील जमील हसन यांनी सांगितले की, त्यांची ७ वर्षांची मुलगी सुफिया शाळेत शिकण्यासाठी गेली होती. जिथे शाळेतील शिक्षक प्रकाश चंद्र पाठक यांनी मुलीला काठीने मारहाण करून तिच्या पाठीवर जखमा केल्या. जखमी अवस्थेत मुलीला घरी आणण्यात आले. जिथे आज मुलगी तीन दिवस वेदनेने आक्रोश करत आहे. तर आरोपी शिक्षक घटनेनंतर शाळेतून फरार झाला आहे. हसन पुढे म्हणाले की, ती घरातून पेन न्यायला विसरली या कारणाने शिक्षकाने तिला मारले. या प्रकारामुळे ती प्रचंड जखमी झाली आहे. त्याचवेळी आरोपी शिक्षक प्रकाशचंद्र पाठक म्हणाले, दोन मुली आपापसात भांडत होत्या, अनेकदा भांडण थांबवायला लावूनही त्या थांबत नसल्याने त्यांना दोन – तीन छड्या माराव्या लागल्या.
याविषयी माहिती देताना एसएचओ शाहिद अन्वर अन्सारी यांनी सांगितले की, पिप्रहिया गावातील जमील हसन यांची मुलगी सुफिया शहीद या शाळेत दुसऱ्या वर्गात शिकते. गेल्या मंगळवारी सुफिया पेन घेऊन शाळेत गेली नव्हती. त्यावर संतप्त शिक्षक प्रकाशचंद्र पाठक यांनी विद्यार्थ्याला मारहाण केली. यामुळे संतापलेल्या मुलीच्या आईने शिक्षकाविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. आम्ही याबाबत चौकशी करत आहोत.