नाशिक – महागड्या बुलेटच चोरणार्या चोरट्यास गुन्हे शाखा एकच्या पथकाने नंदुरबारच्या बसस्थानकातून शिताफिने जेेरबंद केले. त्याच्याकडून १० लाख ८० हजाराच्या ७ बुलेट, दोन स्प्लेंडर या दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. पवन उर्फ विक्की प्रेमचंद पाटील (२५, रा.नवागाव , उदना , सुरत, गुजरात. मुळ रा.आव्हानी पाळदी , ता . धरणगाव , जि.जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
यबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी सांगीतले, शहरातून वाहन चोरीचे प्रकार वाढले आहेत. प्रामुख्याने ११ एप्रिलला भद्रकाली परिसरातून बुलेटची चोरी झाल्याचा गुन्हा घडला होता.याबाबत गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना हवालदार मुख्तार शेख यांनी ज्या ठिकाणाहुन बुलेट चोरी गेली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याचे बारकाईने निरीक्षण केले. त्याचे तांत्रीक विश्लेषण करून संशयिताची ओळख पटविण्यत यश मिळविले . तसेच हा चोरटा नंदुरबार येथे असल्याची तांत्रीक विश्लेषणावरून माहिती अवगत केली. त्यांनी केलेल्या तपासाची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांना कळविली. त्यांनी तातडीने १४ एप्रिलला गुन्हेशाखेचे सहायक निरिक्षक महेश कुलकर्णी, रघुनाथ शेगर, दिनेश खैरनार, उपनिरिक्षक रविंद्र बागुल पोहवा, येवाजी महाले, रावजी मगर, मोतिराम चव्हाण, मुख्तार शेख, राहुल पालखेडे, प्रविण चव्हाण, गणेश वडजे, समाधान पवार यांचे पथक नंदुरबार येथे रवाना केले.
या पथकाने मिळालेल्या माहिती प्रमाणे आरोपीचा सतत दोन दिवस शोध घेवुन तपास केला अखेरीस खात्रीशिर मिळालेल्या माहितीच्या आधारे नंदुरबार बसस्टॅन्ड परिसरात संशयीतास शिताफिने ताब्यात घेतले . त्याने सुरत ( गुजरात ) ४ , धुळे २, पंचवटी १ , भद्रकाली १, मुंबई नाका१, असे एकुण ९ ठिकाणाहून मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिलेली आहे त्याच्याकडून ९ लाख ८० हजार रूपयांच्या ७ बुलेट तर एक लाख रूपये किंमतीच्या दोन स्प्लेंडर गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. अधिक तपास येवाजी महाले करत आहेत. संशयितास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.