इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशातील इंदूरमधील प्रसिद्ध मंदिर परिसरातील प्रसादाच्या दुकानाची सध्या देशभरात जोरदार चर्चा होत आहे. इंदूरच्या प्रसिद्ध खजराना गणेश मंदिर संकुलातील दुकानाची बोली ऐकून बड्या रिअल इस्टेट दिग्गजांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. अवघ्या ६९.५० चौरस फुटांच्या दुकानाचा लिलाव तब्बल १ कोटी ७२ लाख रुपयांना झाला आहे. ही माहिती देताना मंदिर व्यवस्थापनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दुकानाच्या ३० वर्षांच्या भाडेतत्वावर ही बोली लावली आहे. या डीलचे वर्णन देशातील व्यावसायिक प्रॉपर्टी डीलमधील सर्वात महाग डील म्हणून केले जात आहे.
मंदिराशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन एका व्यक्तीने खजराना मंदिर संकुलातील ‘१-ए’ दुकान ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यासाठी तब्बल १ कोटी ७२ लाख कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली आहे. मंदिराच्या व्यवस्थापन समितीच्या मालकीच्या या दुकानाचे क्षेत्रफळ ६९.५० चौरस फूट असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजेच, तब्बल २.४७ लाख रुपये प्रति चौरस फूट भाडेतत्त्वावर घेण्यासाठी ही सर्वाधिक बोली लावण्यात आली आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, या दुकानाची निविदा प्रक्रिया इंदूर विकास प्राधिकरणामार्फत (आयडीए) पार पडली. मंदिर व्यवस्थापन समितीच्या अटींनुसार दुकानात फक्त फुले, प्रसाद आणि पूजेचे साहित्य विकता येणार आहे. ते म्हणाले की, हे दुकान भाडेतत्त्वावर देण्यासाठी किमान राखीव किंमत ३० लाख रुपये निश्चित करण्यात आली होती आणि याच्या तुलनेत सर्वात जास्त बोली जवळपास सहापट जास्त आहे. खजराना गणेश मंदिरात दररोज देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात आणि मंदिर परिसरातील दुकाने फुले, प्रसाद आणि पूजेचे साहित्य विकतात. खजराना गणेश स्वयंभू असून देशाच्या वेगवेगळ्या भागातून असंख्य भाविक येथे सातत्याने येत असतात. तसेच, हा श्रीगणेश आपल्या मनोकामना पूर्ण करीत असल्याची भाविकांची धारणा आहे.
69 SQFT Parasad Shop Crores of Bid in India
Flower Garland