नोएडा – नोएडा येथे २५ कोटी रुपयांची सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली असून, या प्रकरणात फरारी चार संशियांताना पकडण्यासाठी पोलिसांची पाच पथके रवाना केलेली आहेत. सर्व पथके एनसीआरच्या बाहेर झाडाझडती घेत आहेत. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असून, काही प्रमाणात पुरावे मिळाले आहेत. यामुळे चोरी झालेला मुद्देमाल आणि संशयितांना अटक करण्याची आशा वाढली आहे. चोरी झालेले सोने ४० किलो नसून, ६८ किलोपर्यंत असण्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
कोतवालपूर ऊर्फ कुटवालपूर गावातील रहिवासी गोपाळने चोरीचा कट रचला होता. त्याने साथीदारांना ४० किलो सोने चोरण्याचा प्लॅन सांगितला. चोरीच्या वेळी गोपाळ त्यांच्यासोबत होता. त्याने आरोपींना फ्लॅट नंबर पाहू दिला नव्हता. एका प्रशस्त कारमध्ये चोरीचा मुद्देमाल ठेवण्यात आला होता. सोबत एक विश्वासू साथीदार होता. फ्लॅटमधून चोरी झालेल्या सोन्याचे वजन जवळपास ६८ किलो आहे. ही बाब समोर आल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणातील सोने कसे ताब्यात घ्यायचे याचे पोलिसांसमोरील आव्हान वाढले आहे. संशयितांना अटक करण्यासाठी तीन पथके पाठविण्यात आली आहे.
पोलिसांनी गोपाळच्या जवळच्या माणसाची चौकशी केली. त्यात असे समजले की, गोपाळ नेपाळकडे जाऊ शकतो. पोलिसांनी नेपाळ सीमेवर अधिकारी, कर्मचार्यांना नियुक्त केले आहे. तो नेपाळमध्ये पळून जाऊ नये म्हणून नेपाळ सरकारशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गोपाळ अचानक श्रीमंत कसा झाला, याबाबत गावातील लोकांना संशय आला होता. गोपाळने एकानंतर एक दोन मालमत्तांचा व्यवहार केला आणि त्या अधिक किमतीत विकल्याची माहिती त्याच्या जवळच्या लोकांनी दिली. पैशांची ताकद वाढल्याने त्याची पांढरपेशा नेत्यांकडे चांगलीच ओळख झाली होती. या चोरीपूर्वी त्याने अशाचप्रकारे मोठ्या चोर्या केलेल्या आहेत. पैशांच्या जोरावर तो पांढरपेशा लोकांशी चांगलेच संबंध ठेवून चर्चेत राहू लागला होता.
प्राप्तीकर विभाग आणि ईडीकडून चौकशी
प्राप्तीकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाची पथके रविवारी २५ कोटींच्या चोरी प्रकरणी ग्रेटर नोएडा येथील आम्रपाली ग्रँड येथील किसलय पांडेय यांच्या घरी पोहोचले. तेथे किसलय यांच्या पत्नीची चौकशी केली. त्यानंतर सिल्व्हर सिटी येथील स्थानिक लोकांकडून माहिती घेतली. किसलय फसवणुकीप्रकरणात ११ महिन्यांची शिक्षा भोगून आल्याचे, चौकशीत आढळले.