जयपूर – मजुरीचे काम करणाऱ्या व्यक्तीकडे लाखो रुपयांचे सोने आढळले तर आश्चर्य होणे स्वाभाविकच आहे. ही घटना खरी आहे. जयपूर विमानतळावर एका युवकाची झडती घेतली असता त्याच्याजवळून तब्बल दीड किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे. या सोन्याची किंमत सुमारे लाख रुपये एवढी आहे.
जयपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या पथकाला शारजा येथून आलेल्या विमानामधील युवकावर संशय आला. पथकाने त्याची बराच वेळ चौकशी केली असता तो गडबडला. त्याची कसून तपासणी करताना पँट आणि अंतर्वस्त्राखाली द्रव्य रूपातील सोने आढळले. त्याचे दीड किलो वजन होते. सीमाशुल्क विभागाने युवकाला बेकायदेशीररित्या सोन तस्करी केल्याच्या आरोपावरून अटक केली. त्याच्याकडे आढळलेल्या सोन्याची किंमत ७३ लाख रुपये आहे.
संशयित युवक जोधपूरमधील रहिवासी आहे. तो शारजामध्ये मजुरी करतो. संशयित युवकाच्या माहितीनुसार, त्याला शारजा विमानतळावर कोणीतरी पाउच आणि स्ट्रीप जयपूर पोहोचविण्याची ऑफर केली होती. त्याबदल्यात त्याच्या हवाई प्रवासाच्या तिकीटाचा खर्च करण्याचे ठरले होते. तिकिटाचे पैसे वाचवण्याच्या लोभामुळे त्याने सोने नेण्याचे मान्य केले. परंतु विमानतळाबाहेर हे पाकिट त्याला कोणी आणि कुठे दिले याबाबत त्याने काहीच माहिती दिली नाही.
९९ टक्के शुद्ध सोने
सीमाशुल्क अधिकार्यांच्या माहितीनुसार, हे सोने पेस्टच्या स्वरूपातील असून ते एका पाउचमध्ये ठेवण्यात आले होते. त्याचे वजन १ किलो ८०० ग्रॅम होते. सोन्याच्या पेस्टला भट्टीवर गरम करून प्रक्रिया केली तर ते ९९ टक्के शुद्ध आढळले. जप्त केलेल्या सोन्याचे वजन १५०२.४० ग्रॅम निघाले.