नाशिक – राज्यातील जातीयता, भेदाभेद कमी करण्यासाठी व जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसहाय्य देण्यात येते . सन 2020-21 मध्ये नाशिक विभागातील 620 विवाहित जोडप्यांना 2 कोटी 60 लाख रूपयांचे अर्थसहाय्याचे तात्काळ वाटप केले आहे. अर्थसहाय्य मिळाल्यामुळे विवाहित जोडप्यांच्या संसाराला आर्थिीक बळ मिळाले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांपैकी एक व्यक्ती आणि सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौध्द,शीख या पैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास आंतरजातीय विवाह म्हटला जातो. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गामधील आंतरप्रवर्गातील विवाहित जोडप्यांच्या विवाहास ही आंतरजातीय विवाह म्हणून शासन मान्यता आहे. या योजनेत प्रत्येक जोडप्याला रू.50 हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येत असते.
आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना पती व पत्नीच्या संयुक्त नावाने धनाकर्ष प्रदान करण्यात येत असतो. सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद या कार्यालयामार्फत ही योजना राबविण्यात येत असते.
नाशिक विभागात सन 2020-21 या आर्थिधक वर्षात 620 जोडप्यांना 2 कोटी 60 लाख रूपयांचे अर्थसहाय्य वाटप करण्यात आले. यात नाशिक – 120 जोडप्यांना 60 लाख रूपये, धुळे – 100 जोडप्यांना 50 लाख रूपये, नंदुरबार- 60 जोडप्यांना 30 लाख रूपये, जळगांव – 120 जोडप्यांना 60 लाख रूपये, अहमदनगर – 120 जोडप्यांना 60 लाख रूपयांचे अर्थसहाय्य वाटप करण्यात आले.
आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिलक सहाय्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी पती-पत्नी हे महाराष्ट्रातील रहिवाशी असावेत. जातीचा दाखला व आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वरील कागदपत्रांची पूर्तता करून अर्जदार यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.