विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
आसाममध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. कारण बोंगागाव जिल्ह्यातील एका गावात ईदच्या निमित्ताने काही लोक टेबलावर तिरंगा ठेवून त्यावर भोजन करत होते. या प्रकरणाचे छायाचित्र समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती.
भारतीय राष्ट्रध्वज अर्थात आपला तिरंगा झेंडा हा सर्वच भारतीयांचा अभिमानाचा आणि गौरवाचा विषय असताना काही वेळा मात्र अवमानकारक घटना घडतात. अशीच एक घटना आसाम मधील तेन्नागारी गावच्या रेजिना परवीन सुलताना याच्या घरात घडली आहे.
यासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पाच जणांसह रेजिनाला अटक केली. तसेच आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात व्हिडिओमध्ये एक कुटुंब टेबलवर कापड म्हणून भारतीय ध्वज वापरुन ईदची पार्टी करत होते. देशभरातील राष्ट्रप्रेमी लोकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. तसेच आता पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.