विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सध्याच्या काळात पंतप्रधानापासून ते सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत सर्वजण आपापल्या परीने आपदग्रस्तांना आपदग्रस्तांना, रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाइकांना मदतीचा हात देत आहेत. त्यात देशभरातील कोर्ट देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. केंद्र सरकार असो की राज्य सरकार यांच्याकडून कोरोना काळात विविध पातळ्यांवर होत असलेली दिरंगाई असो की आणखी काही चुका याबाबत कोर्टाने वारंवार फटकारले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने अनेक आदेश देखील दिले आहेत. त्यामुळेच एका विद्यार्थिनीने सरन्यायाधीश यांनाच याबाबत आभाराचे पत्र लिहिले आहे.
केरळमधील पाचवीच्या विद्यार्थिनीने मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांना एक पत्र लिहिले असून कोविड -१९ या साथरोग काळात सर्व देशभर सुरू असलेला लढा आणि त्याची योग्य अंमलबजावणीसाठी प्रभावी हस्तक्षेप करत लोकांचा जीव वाचवल्याबद्दल कोर्टाचे आभार मानले आहेत. त्रिशूर केंद्रीय विद्यालयाची लिडविना जोसेफ हिने स्वत: चे रेखाचित्र व इतर चित्रांसह राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे हसतमुख चित्र पाठवले आहे.
या पत्रात तिने लिहिले आहे की, राजधानी दिल्ली आणि देशातील इतर भागात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबद्दल आम्ही फारच काळजीत होतो. या काळात कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आणि सामान्य लोकांचे जीवन वाचवण्यासाठी माननीय न्यायालयाने जोरदार हस्तक्षेप केला. मला आनंद आणि अभिमान आहे की, माननीय कोर्टाने ऑक्सिजन पुरवण्याचे निर्देश दिले ज्यामुळे अनेकांचे जीव वाचले.
कोविड -१९चा प्रभाव कमी करण्यासाठी आणि विशेषत: दिल्लीत मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी कोर्टाने प्रभावी पावले उचलली. याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. विशेष म्हणजे देशाच्या सरन्यायाधीशांनीही विद्यार्थ्याच्या पत्रावर आपली प्रतिक्रिया दिली. यात न्या. एन.व्ही. रमन्ना यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आणि पत्रासह काम करताना न्यायाधीशांनी तिला पाठविलेल्या चित्राबद्दल विद्यार्थ्याचे मनापासून आभार मानले.
सरन्यायाधीशांनी लिहिले की, मला तुमचे मनमोहक पत्र मिळाले ज्यामध्ये हृदयस्पर्शी चित्रेही होती. देशातील घडामोडींविषयी तुम्हाला माहिती आहे याबद्दल मी खूप प्रभावित झालो आहे. मला आशा आहे की, आपण एक सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हाल त्यामुळे चांगले राष्ट्र घडविण्यात योगदान देता येईल.