नाशिक – नागरिकांची लसीकरणापूर्वी अँटीजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी होऊन त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना हुडकून त्यांना आवश्यक सल्ला व उपचार उपलब्ध करून देणे व निगेटिव्ह व्यक्तींचेच लसीकरण व्हावे या संकल्पने द्वारे मिशन झिरो व मिशन लसीकरण हे अभियान नाशिक महानगर पालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व नाशिक वॉरियर्स या संस्थां द्वारे पंचवटी विभागात सुरु करण्यात आले आहे.
या मोहिमेत लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्क्रिनिंग होणार असून त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध होतील व गर्दीत होणारे संक्रमण थांबेल. तसेच उर्वरित नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला बळकटी मिळणार आहे. इंदिरा गांधी रुग्णालय, मायको दवाखाना फुले नगर, प्राथमिक आरोग्य केंद्र म्ह्सरूळ येथे हे अभियान सुरु झाले असून आज दुसऱ्या दिवशी एकूण ५४२ अँटीजेन चाचण्या होऊन ०५ पॉझिटिव्ह रुग्णांना शोधण्यात यश आले तर ५३७ निगेटिव्ह रुग्णांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. येणे प्रमाणे मिशन सुरु झाल्या पासून दोन दिवसात ९५५ अँटीजेन चाचण्या होऊन १५ पॉझिटिव्ह रुग्णांना शोधण्यात यश आले तर ९४० निगेटिव्ह रुग्णांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. आता फक्त ४५+ वयोगटातील दुसरा डोस घेण्यास पात्र असलेल्या नागरिकांनाच लस दिली जात आहे. याचाच अर्थ पहिला डोस घेतल्या नंतर त्याचा फार चांगल्या रितीने फायदा नागरिकांना होत आहे असे दिसून येत आहे.
लवकरच नाशिकच्या सहा ही विभागातील सर्व लसीकरण केंद्रां जवळ महानगर पालिकेच्या वतीने व या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मिशन झिरो हे अभियान सुरु होणार आहे. या ठिकाणी लसीकरणा व्यतिरिक्त ही नागरिक येऊन अँटीजेन चाचणी करून घेऊ शकतात व त्या योगे मनातील भीती दूर होण्यास मदतच होईल व आवश्यकता असल्यास सल्ला व उपचार घेऊ शकतात त्या मुळे पुढील संक्रमण रोखण्यास हातभार लागेल.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील गरज लक्षात घेऊन जेष्ठ समाजसेवक, बी जे एस संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या संकल्पनेतून देशभर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन च्या माध्यमातून ”बी जे एस मिशन ऑक्सिजन बँक” कार्यरत आहे. तसेच बी जे एस, वॉटर ग्रेस व नाशिक वॉरियर्स या स्वयंसेवी संस्था पुनश्च ऍक्शन मोड वर आल्या असून महानगर पालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार मिशन झिरो नाशिक व मिशन लसीकरण हे अभियान सुरु केले आहे.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी म न पा चे पदाधिकारी, नगरसेवक, आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंके, पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे, कोरोना नोडल अधिकारी डॉ विजय देवकर, डॉ. कल्याणी होळकर, आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या बरोबरीने मिशन झिरो व मिशन लसीकरण मोहिमेचे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला, दीपक चोपडा, वॉटर ग्रेसचे चेतन बोरा, नाशिक वॉरियर्सचे रामेश्वर मालानी, विनोद गणेरीवाल, बी जे एस चे ललित सुराणा, अभय ब्रम्हेचा, अमित बोरा, गोटू चोरडिया, गौतम हिरन, रवींद्र चोपडा, रोशन टाटीया, किरण धनराय हे परिश्रम घेत आहेत.