पानिपत – ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या स्वागतासाठी पानिपत येथील खंडरा गावात जय्यत तयारी सुरू झाली आहे. गावातील मुलाने देशासाठी सुवर्णपदक जिंकल्याने ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाहीय. सर्वत्र उत्सवाचे वातावरण असून, मेजवानीची तयारी सुरू झाली आहे. जवळपास वीस हजार लोकांसाठी भोजनाची सोय करण्यात येणार आहे. शंभर आचारी जेवणाची तयारी करणार आहेत. पाच हजार किलोच्या लाडूंसह ३५०० किलो गुलाब जामून आणि १५०० किलो जिलेबी बनविण्यात येणार आहे.
मिठाई बनविण्याचे काम गुरुवारी सुरू करण्यात आले आहे. तीन दिवस मिठाईच बनविली जाईल. या कामासाठी ४० हलवाई काम करत आहेत. नीरजचे काका सुरेंद्र चोप्रा सांगतात, १५ ऑगस्टनंतर नीरज कधीही गावात येण्याची शक्यता आहे. सुवर्णपदक जिंकण्याच्या आनंदात संपूर्ण गावाला मेजवानी देण्यात येणार आहे.
हरियाणाची परंपरा कायम ठेवणार
नीरजचे काका सुल्तान म्हणाले की, घरी आलेल्या पाहुण्यांना जेवल्याशिवाय परत जाऊ दिले जात नाही, ही हरियाणाची परंपरा आहे. पुतण्या ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून येत आहे. या आनंदात घरी येणार्या प्रत्येक पाहुण्याचे तोंड गोड करण्यासह भोजनाशिवाय कोणालाही माघारी पाठविले जाणार नाही. गावात कोणतेही लग्न कितीही धूमधामीत लग्न केले तरी जास्तीत जास्त दहा गोण्या साखर लागते. परंतु नीरज येण्याच्या आनंदात आतापर्यंत १०० गोण्या साखर लागली असून, ती फक्त दोन दिवसातच संपणार आहे.
वीस हजार लोकांना जेवण
अडीच हजार लोकसंख्या असलेल्या खंडरा गावात २० हजार लोकांसाठी जेवण तयार केले जाणार आहे. नीरज चोप्राचे वडील सतीश चोप्रा यांच्या म्हणण्यानुसार, नीरज याच्या चाहत्यांचा काहीच हिशेब लावला जाऊ शकत नाही. त्याचे चाहते फक्त हरियाणातच नाही, तर संपूर्ण देशात आहेत. नीरज आल्यावर १०० ते १५० आचारींना बसविले जाणार आहे.
चार गल्ल्यांमध्ये जेवणाचे मंडप
नीरजला सन्मानित करण्यासाठी तसेच लोक त्याला सहज पाहू शकतीय या पद्धतीने एका गल्लीत व्यासपीठ लावले जाणार आहे. तसेच चार गल्ल्यांमध्ये जेवणाचे मंडप उभारण्यात येणार आहेत. जेवणाचे दोन मंडप पुरुषांसाठी तर दोन महिलांसाठी असतील. गर्दी टाळण्यासाठी नीरजच्या शेजारच्या चार ते पाच गल्ल्यांमध्ये एलईडी लावले जाणार आहेत. दोन एलईडी नीरजच्या घराच्या बाहेर लावले जातील.