भुवनेश्वर (ओडिसा) – कोरोनाच्या संकटात अनेक जण माणुसकीही विसरले आहेत. त्याचा प्रत्यय वेळोवेळी येत आहे. खासकरुन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना लुटणार्या माणसांच्या रुपात सैतानच कार्यरत असल्याचेही बोलले जाते. कारण याकाळात रुग्णालयात आवश्यक असलेल्या औषधांची काळाबाजार आणि बेडसाठी लाच देण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असाच एक माणुसकीला लाजवणारा प्रकार ओडिसा राज्यातील केनझार जिल्ह्यात घडला आहे.
कृष्णपूर गावात राहणाऱ्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या कोविड-रुग्णालयात दाखल केले. मात्र मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह रुग्णालय व्यवस्थापनाने कुटुंबातील सदस्यांकडे सोपविला. त्यानंतर स्मशानभूमीत हा मृतदेह आणला गेला. तेव्हा तेथे चक्क ‘मृतांच्या टाळू वरील लोणी खाण्याचा’ प्रकार घडला. त्या मृतदेहाचा चेहरा दर्शविण्यासाठी तिच्या मुलाकडे तब्बल ५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि तो व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.
कोरोना साथीच्या लाटेत मृत्यूची संख्या जास्त असल्याने स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांनाही वेटिंगवर ठेवले गेले. स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, ‘ तुम्ही ५ हजार रुपये दिले तर मी तुम्हाला पूर्णपणे तुमच्या आईचा चेहरा पाहू देईन, नाहीतर मी पीपीई किटमध्ये पॅक केल्याप्रमाणे मृतदेह अंत्यसंस्कार करीन.’
लाच घेणार्याला जेव्हा कळले की, मृताच्या मुलाकडून त्याचे मोबाईलवर संभाषण नोंदले जात असून व्हिडीओ काढला आहे, तेव्हा त्याने याचा जाब विचारला. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर परिसरातील लोकांनी स्मशानभूमीतील कर्मचार्यांच्या वागण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, केणझारचे जिल्हाधिकारी आशिष ठाकरे म्हणाले की, सदर व्हिडिओ मिळाला असून त्यावर चौकशीचे आदेश दिले आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.