सुरत (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी बँकेत दरोडे पडण्याचे प्रकार नेहमी घडत असत. या संदर्भात अनेक हिंदी चित्रपटांमध्ये या घटना दाखविल्या जात असत, अगदी दिवाळी अंकातही या संदर्भात कथा किंवा व्यंगचित्रे देखील प्रसिद्ध होत असत. परंतु अलीकडच्या काळात कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही सारख्या तंत्रज्ञानामुळे बँकेवर दरोडे पडण्याचे प्रकार कमी झाले आहेत, महाराष्ट्र व गुजरात सारख्या राज्यात फारसे दरोडे पडत नाहीत. बिहार उत्तर प्रदेश सारख्या राज्यात अद्यापही असे प्रकार घडतात. परंतु गुजरात मध्ये महाराष्ट्र बँकेच्या म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राच्या एका शाखेवर दरोडा पडला. आणि दरोडेखोरांनी चक्क १४ लाख रुपये लुटले, सुरतेत ही लूट घडली.
सीसीटीव्ही कॅमेरा घटना कैद
सुरत येथे शुक्रवारी बँकेचे सकाळी ११ वाजता कामकाज सुरू असताना दिवसाढवळ्या ५ दरोडेखोरांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या सुरत शाखेत दरोडा टाकून तब्बल १४ लाखांची रोखड लंपास केली, आणखी विशेष म्हणजे दरोडेखोर डोक्यात हेल्मेट घालून दुचाकीने बँकेत आले होते. शस्त्रधारी दरोडेखोरांनी भरदिवसा बँकेत चोरी केली आणि लगेच घटनास्थळावरून पळ काढला. परंतु, त्यांचा हा सर्व प्रकार बँकेच्या आतील आणि बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये दरोडेखोर दोन दुचाकीवरून बँकेत दरोडा टाकण्यासाठी आले, त्याचे चित्र बँकेच्या आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर इमारतीत शिरताना दिसत आहेत. त्यानंतर लगेचच त्यांनी पिस्तूल बाहेर काढून बँक कर्मचारी तसेच ग्राहकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. बँकेत सकाळच्या वेळी ग्राहक आले असताना हा भयानक प्रकार घडल्याने कर्मचारी व ग्राहक घाबरून गेले भीतीमुळे कोणाला काय करावे हे सूचेना. याचाच दरोडेखोरांनी फायदा घेतला.
दरोडेखोरांनी बँकेतील ग्राहक व कर्मचाऱ्यांना खोलीत कोंडले
शस्त्रधारी दरोडेखोरांनी शस्त्रे दाखवून काऊंटरमधील पैसे त्यांच्या बॅगमध्ये ठेवण्याची धमकी दिली. त्यानंतर दरोडेखोरांनी बँकेतील सर्व ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना एका खोलीत कोंडून ठेवले. शक्यतो सर्व दरोडेखोर काळे कपडे घालून येतात, मात्र या घटनेत काही जणांनी गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केलेले होते, त्या दरोडेखोरांपैकी एकाने काउंटरवर पैसे शोधण्यास सुरुवात केली. त्यानंतर, काळ्या रंगाचा शर्ट घातलेला, फक्त तोंडावर स्कार्फ बांधलेला दरोडेखोर त्याच्या बॅगेत पैसे कोंबू लागला. त्याने बॅग भरल्यानंतर ते बाहेर पडले. या दरोड्याची माहिती मिळताच सुरत पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरत पोलिसांनी रेड अलर्ट जारी करून सर्वत्र शोध सुरू केला आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
5 robbers robbed Maharashtra Bank of 14 lakhs...in surat