मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
पेट्रोल, डिझेल सारख्या इंधनाचे दर गगनाला भिडल्याने सध्या इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. बहुतांश जणांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढला आहे. मात्र इलेक्ट्रिक वाहन चालवण्याची मुख्य समस्या म्हणजे चार्जिंग करणे होय. अद्यापही इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशन उपलब्ध नाही.
इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे, परंतु तरीही ग्राहकांना ते चार्ज करण्याची समस्या आहे. जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी इलेक्ट्रिक वाहने एका तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण चार्ज होऊ शकतात, तरीही बहुतांश EV ला अनेक तास लागतात. आता चीनची दिग्गज तंत्रज्ञान कंपनी Huawei असे चार्जिंग तंत्रज्ञान आणणार आहे जे इलेक्ट्रिक वाहन उद्योग पूर्णपणे बदलून टाकेल.
एका रिपोर्टनुसार, Huawei चे हे चार्जिंग तंत्रज्ञान केवळ 5 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये वाहन 200 किमीच्या रेंजसाठी तयार करेल. याचा खुलासा हुआवेईचे वरिष्ठ कार्यकारी वांग चाऊ यांनी केला आहे. ते म्हणाले की, सदर कंपनीने 2021 मध्ये स्मार्ट ड्रायव्हिंग सोल्यूशन सादर केले होते, ज्याद्वारे 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 200 किमीच्या ड्रायव्हिंग रेंजसाठी बॅटरी तयार केली जाते. पुढील काही वर्षांत चार्जिंगचा वेळ 5 मिनिटांपर्यंत नेण्याची कंपनीची योजना आहे, असेही ते म्हणाले.
अदानी टोटल गॅस लिमिटेडने भारतीय बाजारपेठेत त्यांचे पहिले इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन लॉन्च करून या क्षेत्रात प्रवेश केला आहे. यासाठी अदानी समूह आणि फ्रेंच ऊर्जा कंपनी TotalEnergies SE यांनी भागीदारी केली आहे. अदानी टोटलने एका निवेदनात म्हटले आहे की, हे चार्जिंग स्टेशन अहमदाबादच्या मणिनगर येथील ATGL च्या CNG स्टेशनवर सुरू करण्यात आले आहे.
आता कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे ईव्ही चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिक वाहनांच्या मालकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी सर्वोत्तम-इन-क्लास चार्जिंग सुविधा आणि सोयीसुविधा देईल. यासह, कंपनीने देशभरात 1,500 ईव्ही चार्जिंग स्टेशन स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.