विलास पाटील
सिन्नर – कोरोनाने सिन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागात सुरू केलेला कहर थांबण्याचे नाव घेत नसून गावागावात दररोज होणारे मृत्यू सर्वांची चिंता वाढवत आहे. तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे गेल्या १५ दिवसात २०-२५ रुग्ण कोरोनाने दगावले असून त्यात एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींचा समावेश आहे. त्यांचा सामुहिक दशक्रिया विधी रविवारी (दि.१६) कोरोनाचे सारे नियम पाळत पार पडणार आहे. या पाचही मृत झालेल्यांचे फोटो ३-४ दिवसांपासून सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. तालुक्यातील गुळवंच येथे कोरोनामुळे मृत्यूने थैमान घातले असून तेथील मृतांचा आकडा ४० च्या जवळ पोहचला आहे. तालुक्यातील दोडी बुद्रुक व निमगाव-सिन्नरसह अनेक गावांमध्ये मृत्यूचे आकडे दोन अंकी संख्या ओलांडून पुढे गेले आहेत.
नांदुरशिंगोटे येथील ज्येष्ठ शेतकरी बाबूराव शिवराम शेळके व त्यांची पत्नी लक्ष्मीबाई बाबूराव शेळके यांच्यासह त्यांचे पुत्र सुरेश बाबूराव शेळके, रमेश बाबूराव शेळके यांचा कोरोनाने मृत्यू झाला तर रमेश यांचा इंजिनिअर असलेला व पुणे येथे नोकरीला असणारा ३० वर्षीय मुलगा सचिन याचाही कोरोनाने बळी घेतला आहे. रमेश यांना तापासारखी लक्षणे जाणवू लागल्याने ते दापुर येथील बहिणीकडे मुक्कामी गेले होते. या बहिनीलाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. शुक्रवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या पतीवरही नांदूर येथेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेळके कुटुंबातील अजूनही दोघा-तिघांवरही उपचार सुरू आहेत.
नांदूरमधीलच महादू पांडुरंग आव्हाड यांचे ८ दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या आई भिकुबाई आव्हाड यांचा उपचार सुरू असताना ४ दिवसांपूर्वी मृत्यू झाला तर वडील पांडुरंग किसन आव्हाड यांचा ३ दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी लोहकरे कुटुंबातील दोघांचा, नन्नावरे व सावजी कुटुंबातील प्रत्येकी एकाचा १४ तारखेला दशक्रिया विधी पार पडला. गेल्या २०-२२ दिवसांमध्ये गावात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २०-२२ च्या पुढे गेली असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. शेजारील दोडी बुद्रुक येथेही दरोरोज १-२ मृत्यू होत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. तालुक्यातील गुळवंच गावाने कोरोनामुळे मृत्यूचा उच्चांक गाठला असून तेथील मृत्यूचा आकडा ४० जवळ पोहचल्याची चर्चा आहे. शेजारील निमगाव-सिन्नर येथे मृत्यूचे थैमान सुरू असून या गावानेही २० चा आकडा पार केला असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. तालुक्यातील चिंचोली,नायगांव, माळेगाव, पांढूर्ली, सोनारी, हरसुले, लोणारवाडी, मुसळगाव, मनेगाव, दापूर, दातली, दोडी, देवपूर, पांगरी, सायाळेपर्यंत प्रत्येक गावांमध्ये आठवड्याला एक-दोन मृत्यू होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सिन्नर शहरातही एखादा अपवाद वगळता दरोरोज एक-दोन मृत्यू होत आहेत. त्यात ज्येष्ठांसह तरुणांचा समावेश असल्याने संपूर्ण तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.
कोरोना टेस्ट करा
कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसली तर ताबडतोब शासकीय रुग्णालयामध्ये किंवा कोरोना केअर सेंटरमध्ये जाणे गरजेचे आहे. मात्र अनेक रुग्ण हे खासगी दवाखान्यात जाऊन गोळ्या औषधे व सलाईन घेण्यात आठ – आठ दिवस घालवतात. त्यामुळे रुग्णांच्या जीवावर बेतते. असे घडू नये यासाठी खासगी सेवा देणा-यां डॅाक्टरांनी सुध्दा असे रुग्ण आपल्याकडे आल्यास कोरोना टेस्ट करण्यास त्यांना पहिल्यांदा पाठवावे. त्यामुळे असे प्रकार घडणार नाही.
शोभा दिपक बर्के, सभापती पंचायत, समिती सिन्नर