मुंबई – आपल्याकडे मुबलक पाणी असल्याने त्याची म्हणावी तशी किंमत आपल्याला नाही. हो. पण, पाच लिटर पाण्याची बाटली तब्बल ७४ लाख रुपयांना असल्याचे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे खरे आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या देशांवर कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांत चांगलेच आभाळ कोसळले आहे. यात व्हेनेझुएलाची स्थिती तर अत्यंत दयनीय आहे. या देशाचे चलन बोलीव्हरची किंमत चांगलीच घसरली आहे. आता येथे पाच लिटर पाण्याची बॉटल खरेदी करण्यासाठी ७४ लाख बोलीव्हर म्हणजे जवळपास १३६ भारतीय रुपये खर्च करावे लागत आहेत
जगात सर्वांत स्वस्त पेट्रोल व्हेनेझुएलामध्ये मिळते. त्यामुळे या देशाबद्दल भारतासारख्या देशांना तर विशेष आकर्षण आहे. याठिकाणी मिळणाऱ्या एक लिटर पेट्रोलची किंमत भारतासाठी केवळ १ रुपये ४८ पैसे एवढी आहे. अर्थात व्हेनेझुएलातील नागरिकांसाठी १.४८ रुपये म्हणजे डोंगराएवढे आहेत, ही वेगळी बाब आहे. दक्षिण अमेरिकेतील या देशाने स्पष्ट केले आहे की नव्या चलन व्यवस्थेत १० लाख बोलीव्हरची किंमत १ बोलीव्हर होणार आहे. वाढती महागाईच यामागचे मुख्य कारण आहे.
व्हेनेझुएलाच्या केंद्रीय बँकेने घोषणा केली आहे की बोलीव्हरमधील हा बदल १ ऑक्टोबरपासून लागू होईल. नव्या व्यवस्थेत १०० बोलीव्हर हीच सर्वांत मोठी नोट असेल आणि त्याची किंमत वर्तमानातील १० कोटी बोलीव्हरएवढी असेल. व्हेनेझुएलातील महागाईचे हे सलग सहावे वर्ष आहे. खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या, अन्न-धान्याच्या किंमती वाढल्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. गरिबीचे प्रमाण वाढत असून सरकारनेही हात टेकले आहेत. सध्या १० लाख बोलीव्हर हीच सर्वांत मोठी नोट या देशात आहे, हे दुर्दैव.