गांधीनगर (गुजरात) – जिल्ह्यातील संतेज भागातील एका औषध कारखान्यात सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या ५ मजुरांचा मृत्यू झाला. रिसायकलिंग टाकीची साफसफाई करत असलेला एक मजूर हानीकारक आणि विषारी वायूमुळे गुदमरून गेला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी आणखी चार मजूर धावून आले आणि ते देखील टाकीत उतरले त्यांनाही त्रास झाल्याने बेशुद्ध पडून सर्वांचा मृत्यू झाला.
गांधीनगर जिल्ह्यातील संतेज भागातील खत्रज गावाजवळील तुतसान फार्मा प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या औषध कारखान्यात ही दुर्घटना घडली, असे अग्निशमन विभागाचे अधिकारी महेशभाई मोध यांनी सांगितले. औषध कारखान्यात ईटीपी प्लांटमधील रिसायकलिंग टँकमधील दूषित पाणी साफ करणाऱ्या मजुराला वाचवण्यासाठी आलेल्या आणखी ४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले तसेच अग्निशमन दलाला देखील तत्काळ पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मजुरांचे मृतदेह टाकीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलीस म्हणाले की, मृतांमध्ये विनय कुमार , सुशीभाई, आर. गुप्ता, देवेंद्र कुमार डी., अनिशकुमार पी. आणि राजकुमार पी. यांचा समावेश आहे. ते सर्व कंपनीचे कर्मचारी होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे.