नवी दिल्ली – विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वैध मापनशास्त्र विभागाने (पॅकेज्ड कमोडिटी) विविध कंपन्यांना २०२ नोटीस बजावण्यात आल्या. सर्वाधिक नोटीस या इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित आहेत. याच अंतर्गत वैध मापनशास्त्र नियमांनुसार, ७५ कंपन्यांकडून तब्बल ४१ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए)ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कठोर कारवाई केली आहे.सणासुदीच्या काळात, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ही कठोर कारवाई केली. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण कशाप्रकारे कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे ग्राहकांच्या हक्काचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईची पकड घट्ट करत आहे यासंदर्भात आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव श्रीमती लीना नंदन यांनी माहिती दिली.
ई-वाणिज्य मंचावर सूचीबद्ध केलेल्या उत्पादनांच्या मूळ देशाबद्दल असत्य माहिती आणि त्या उत्पादनाचा मूळ देश घोषित करण्यात अयशस्वी ठरणे यांसारख्या प्रकारांचा या नियम उल्लंघनामध्ये समावेश आहे. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन पोर्टलवर असंख्य ग्राहकांकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली.
ग्राहक संरक्षण (ई-वाणिज्य ) नियम, 2020 चा नियम 6(5)(d) अंतर्गत ई- वाणिज्य बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या उत्पादन आणि सेवांच्या मूळ देशासह संबंधित तपशील प्रदान करणे कोणत्याही विक्रेत्याला अनिवार्य आहे, खरेदीपूर्व टप्प्यावर ग्राहकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी हे आवश्यक आहे. नियम 4(3) मध्ये पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, कोणतीही ई-वाणिज्य कंपनी त्यांच्या मंचाच्या माध्यमातून किंवा अन्य ठिकाणावरून व्यवसाय करताना कोणत्याही अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब करणार नाही.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने त्यांच्या मंचावर नोंदवलेल्या नियम उल्लंघनांच्या तक्रारीप्रकरणी च्या ई-वाणिज्य कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. या प्रकारणांसंदर्भात अशा कंपन्यांनी कोणती ठोस पावले उचलली आहेत याचे तपशीलवार उत्तर देण्याचे निर्देश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने संबंधित कंपन्यांना दिले आहेत.वैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमाअंतर्गत देखील ई-वाणिज्य मंचावर मूळ देशाची घोषणा करणे अनिवार्य आहे. वैध मापनशास्त्र कायद्यांतर्गत आवश्यक कारवाईसाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणदेखील वैध मापनशास्त्र विभागाच्या समन्वयाने काम करत आहे.
अशा प्रकारे, 16.10.20 ते 22.10.21 या कालावधीत उत्पादनाच्या मूळ देशाची माहिती देताना केलेल्या नियमांच्या उल्लंघनासंदर्भात 202 नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. यापैकी नियमांचे उल्लंघन केलेल्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांशी संबंधित सर्वाधिक 47 नोटिस तर त्यापाठोपाठ कपडे उत्पादनाशी संबंधित 35 नोटीस बजावण्यात आल्या आहेत. 75 कंपन्यांनी एकापेक्षा जास्त गुन्हे केले आहेत त्यापैकी 68 कंपन्यांचे गुन्हे हे उत्पादनाच्या मूळ देशाची माहिती देताना नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित आहेत. गुन्ह्यांचे एकत्रीकरण करून एकूण 41,85,500 रुपये संकलित करण्यात आले आहेत.
आवश्यक माहितीच्या अभावामुळे, ग्राहकाला उत्पादन किंवा सेवेबद्दल माहिती नसते.ई – वाणिज्य मंचावर विक्रेत्याचे नाव, संपर्क क्रमांक आणि तक्रार अधिकारी पदासंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नसल्यास, ग्राहकाला कोणत्याही तक्रारीच्या बाबतीत मार्केटप्लेस ई-वाणिज्य कंपन्यांशी संपर्क करण्याशिवाय पर्याय नाही.या कंपन्या सांगतात की, मार्केटप्लेस ई – वाणिज्य कंपन्या केवळ मध्यस्थ आहेत आणि उत्पादनासंदर्भातील कोणत्याही तक्रारीसाठी त्या जबाबदार नाहीत आणि त्यांच्या व्यासपीठावर केलेल्या खरेदीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही दायित्वासाठी विक्रेता जबाबदार आहे , ही गोष्ट ,केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला आढावा घेताना आढळून आली आहे. म्हणून,केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने 01.10.2021 रोजी सर्व मार्केटप्लेस ई-वाणिज्य मंचांना ई-वाणिज्य नियम, 2020 नुसार विक्रेत्यांद्वारे प्रदान केलेली माहिती प्रदर्शित करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.