मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मेसज, लिंक वा ओटीपीद्वारे ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सुशिक्षत, चांगल्या घरातील लोक देखील या प्रकारच्या फसवणुकीला बळी पडताहेत. या पार्श्वभूमीवर एका मेसेजद्वारे चाळीस जणांची फसवणूक झाल्याचा प्रकार पुढे आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांकडून मोबाइलवर एक मेसेज पाठवला जातो. त्या मेसेजमध्ये एक लिंक पाठवली जाते. या लिंकवर क्लिक करून पॅन कार्ड क्रमांक अपडेट करण्यास सांगितले जाते. त्यानंतर मोबइलवर एक फोन येतो. त्यावर आलेला ओटीपी मागण्यात येतो. ओटीपी देताच लाखोंची फसवणूक होत आहे. हा प्रकार सिने अभिनेत्री श्वेता मेनन हीच्यासोबतदेखील घडला आहे.
तिने दिलेल्या माहितीनुसार,‘फसवणूक करणाऱ्याने मला मेसेज पाठवला होता. त्या लिंकवर मी क्लिक केल्यानंतर माझे बँकिंग डिटेल त्याच्याकडे गेले. तिथे मी दोन वेळा ओटीपी, माझा पॅन कार्ड नंबर, नेट बँकिंग आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर माझ्या खात्यातून ५७ हजार ६०० रुपयांची रक्कम काढून घेण्यात आल्याचे माझ्या लक्षात आले. सुदैवाने मी गमावलेली रक्कम लाखोंमध्ये नाही.’ आतापर्यंत एकूण चाळीस जणांना अशा प्रकारे फसवण्यात आले आहे. त्यामुळे फसवणुकीच्या माध्यमातून मिळविण्यात आलेली रक्कम लाखोंच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच फसवणूक झालेले सर्व तक्रारदार एकाच बँकेचे खातेदार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
एकाच वेळी चाळीस जणांची फसवणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिस सतर्क झाले आहेत. त्यांनी नागरिकांना आवाहन करत अशा प्रकारच्या घटनांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही बँक किंवा अर्थपुरवठा संस्था यांना खातेधारकांकडून बँक डिटेल्स किंवा पासवर्ड मागण्याचा अधिकार नाही, असेदेखील पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे.
40 Peoples Duped with Actress SMS Cyber Crime