मुंबई – ‘कोणाचे नशीब केव्हा उजळेल काही सांगता येत नाही!’ असे म्हटले जाते. याची प्रचिती मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील एका खाणीत काम करणाऱ्या ४ कामगारांना आली. कारण १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना ८.२२ कॅरेटचा हिरा सापडला आहे. ही बाब सध्या विशेष चर्चेची ठरली आहे.
स्थानिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या हिऱ्याची किंमत सुमारे ४० लाख रुपयांपर्यंत असू शकते. तसेच अधिकाऱ्यांनी सांगितले की, या रफ हिऱ्यांच्या लिलावातून मिळणारी रक्कम शासकीय रॉयल्टी आणि कर कापल्यानंतर संबंधित खाण कामगारांना दिली जाईल. तर पन्नाचे जिल्हाधिकारी संजयकुमार मिश्रा यांनी सांगितले की, रतनलाल प्रजापती आणि त्यांच्या ३ सहकाऱ्यांनी जिल्ह्यातील हिरापूर टपरिया परिसरातील भाडेतत्त्वावरील जमिनीतून हा हिरा काढला असून तो कार्यालयात जमा केला. सदर हिरा हा दि. २१ सप्टेंबरला इतर रत्नांसह लिलावासाठी ठेवला जाईल.
रत्नालाल प्रजापती आणि रघुवीर प्रजापती यांनी सरकारी कार्यालयात मौल्यवान हिरा जमा केल्यानंतर सांगितले की, त्यांनी हिरे शोधण्यासाठी गेली १५ वर्षे विविध खाणींमध्ये घालवली होती, परंतु त्यांना प्रथमच यश मिळाले. आम्ही वेगवेगळ्या भागात भाडेतत्त्वावर छोट्या खाणी घेतल्या असून गेल्या सहा महिन्यांपासून हिरापूर टपरिया येथील भाडेतत्त्वावरील जमिनीवर खाणकाम करत आहोत, तेथे आम्हाला हा हिरा सापडल्याने आश्चर्य वाटले. हिऱ्यांच्या लिलावातून मिळणारी रक्कम आपल्या मुलांना चांगले जीवन आणि शिक्षण देण्यासाठी वापरतील.