दुबई – आयसीसी टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना खेळला जाणार आहे. त्यापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाच्या शिबिरात सहभागी झालेल्या चार खेळाडूंना मायदेशी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. कृष्णप्पा गौतम, कर्ण शर्मा, व्यंकटेश अय्यर आणि शाहबाज नदीम या चार खेळाडूंचा त्यात समावेश आहे.
देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांपैकी एक सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी हे खेळाडू भारतात परतणार आहेत. यूएईमध्ये नेट गोलंदाजीसाठी आठ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्यापैकी उम्रान मलिक, आवेश खान, हर्षल पटेल आणि लूकमन मेरिवाला हे खेळाडू यूएईमध्येच थांबणार आहेत.
टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या सुपर १२ चे सामने सुरू झाल्यानंतर सरावसत्रे होण्याची शक्यता नाही. त्यामुळे यूएईतील या खेळाडूंना मायदेशी परत पाठविल्यास त्यांना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सराव करण्याची संधी मिळेल. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बीसीसीआयच्या अधिकार्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. विश्वचषकादरम्यान सरावासाठी नेट गोलंदाजांना महत्त्व दिले आहे. उर्वरित चारही गोलंदाज विश्वचषकात भारतीय संघासोबत राहणार आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.