विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई उच्च न्यायालायात आणखी ४ अतिरीक्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच काही न्यायधीशांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्त्यांमुळे न्यायालयातील खटले निकाली निघण्यात मदत होणार आहे.
भारतीय राज्य घटनेच्या कलम २२४ च्या उपकलम (l) ने बहाल केलेल्या अधिकारांचा वापर करत राष्ट्रपतींनी ४ न्यायाधीशांच्या नावांना मंजुरी दिली. त्यात राजेश नारायणदास लड्ढा, संजय गणपतराव मेहरे, गोविंद आनंद सानप आणि शिवकुमार गणपतराव दिगे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली आहे. ही नेमणूक त्यांच्या संबंधित कार्यालयांचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना कायदा व न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाने जारी करण्यात आली आहे.