मुंबई – बेरोजगारी आणि गरिबीने गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ झाली. छोट्या-मोठ्या चोऱ्या करणाऱ्यांपासून ते कॉर्पोरेट चोऱ्या करणाऱ्यांपर्यंतचे प्रमाणही वेगाने वाढत गेले. असाच एक प्रकार बिहारमध्ये उघडकीस आला आहे. याठिकाणी ग्रामीण विकास विभागातून ३८ कनिष्ठ अभियंत्यांनी (इंजिनीअर) कोट्यवधी रुपयांचा अॅडव्हान्स उचलला आणि फरार झाले आहेत. आता विभाग डोळ्यात तेल घालून या अभियंत्यांचा शोध घेत आहे.
ग्रामीण विकास विभागाचे अभियंता प्रमुख अशोक कुमार मिश्रा यांनी यासंदर्भात सर्व कार्यालयांना पत्र लिहीले आहे. पत्रात 38 कनिष्ठ अभियंत्यांनी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत अॅडव्हान्स उचलला होता. ही एकूण रक्कम 7 कोटी 94 लाख रुपये एवढी आहे. अॅडव्हान्स उचलल्यानंतर अभियंत्यांनी या पैश्यांचा हिशेबच दिलेला नाही.
विशेष म्हणजे यातील अनेक अभियंते सेवानिवृत्त झाले तर काहींचा मृत्यूही झाला. 38 पैकी 20 कनिष्ठ अभियंते सेवानिवृत्त झाले आहेत. तर 15 कार्यरत आहे. दोघांचा मृत्यू झाला तर एकावर कारवाई सुरू झाली आहे. कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या अभियंत्यांचे पत्ते व संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याचाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.
तर वसुली होईल
अॅडव्हान्स घेतलेली रक्कम परत भरण्यात आली नाही, तर कनिष्ठ अभियंत्यांकडून वसूल करण्यात येईल. कार्यरत अभियंत्यांकडून वेतनाच्या रुपात तर सेवानिवृत्त अभियंत्यांकडून पेन्शनच्या रुपात पैसा वसूल करण्यात येईल. ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबियांकडून ही रक्कम वसूल करण्यात येईल.