प्रतिनिधी, चांदवड
नाशिक जिल्ह्यातील णमोकार तिर्थ मालसाने (ता. चांदवड) येथे ज्ञानयोगी प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य देवनंदी गुरूदेव यांच्या संकल्पनेमधून अरिहंत भगवान मूर्ती साकारण्यात येत आहे. त्यासाठी तब्बल ३६४ टन वजनाची अखंड शिला चांदवड शहरालगतच्या नॅशनल हायवेला आली असता चांदवड शहरातील सर्व भाविकांनी व सकाळ जैन समाजाने या महाशिलेचे स्वागत केले.
समाजाचे अध्यक्ष नरेंद्र कासलीवाल, उपाध्यक्ष सुभाष अजमेरा, प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, जव्हारलालाजी संकलेचा, ईश्वर बाफना, मांगीलालजी कासलीवाल, केशरचंद पटणी, मोहनलाल अजमेरा, राजेंद्र कासलीवाल, राजेंद्र अजमेरा, दर्शन अजमेरा, शांतीलाल कासलीवाल, वर्धमान पांडे, प्रविण कासलीवाल, चंद्रशेखर कासलीवाल, संजय महाजन, योगेश अजमेरा, अल्केश अजमेरा, सुनील डूंगरवाल , पराग कासलीवाल यांनी सामूहिक शांतीमंत्राचे पठण करत महाकाय शिलेस पुष्पहार घालून स्वागत केले.
अशोक व्यवहारे, महेंद्र कंक्रेज, शरद बोराडे, राजु बिरार,नितीन फंगाळ,मोबिन खान यांनीही चांदवडकरांच्यावतीने शिलेचे या स्वागत केले. मूर्तीची प्रतिष्ठापना श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली यांच्या मूर्तीच्या धर्तीवर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कर्नाटकमधील बेंगलोर जवळच्या देवनहळ्ळी येथून हा ३६४ टन वजनाचा क्रिम कलरचा ग्रेनाईड पाषाण १६६ टायरच्या ट्रेलरमधून आणण्यात आला आहे. हैद्राबाद सोलापूर, मोहोळ, मोडलिंब, करमाळा , नगर, शिर्डी, येवला , मनमाड, मालेगाव, मार्गे शुक्रवारी दुपारी चांदवड शहरात महाकाय शिलेचे आगमन झाले.तसेच नमोकर येथे दि.५/६/२१ रोजी सकाळी ही गाडी पोहचेलव घटनास्थळी स्वागत करणार आहे
ट्रेलरचे मालक व चालक कुलदिपसिंह म्हणाले, देवणहळ्ळी जवळच्या छप्पडकल्ल तलावाच्या पाण्यातून हा पाषाण कोरण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी गेला. तेथून मुख्य रस्त्यावर आणण्याकरिता तीन दिवस गेले. चार मोठ्या क्रेनच्या सहाय्याने ही शिला ट्रेलरवर विराजमान करण्यात आली. नऊ जणांची आमची टीम ही शिला घेऊन निघाल्यापासून शुध्द शाकाहारच करत आहे. १३०० किलोमीटरचे अंतर ४० दिवसात पार करून ५ जून रोजी सकाळी ७ वाजेला मालसाने पोहोचणार आहोत. ताशी दहा ते बारा किलोमीटरच्या वेगाने दररोज ४० ते ५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करीत आहोत..
यावेळी चांदवड शहरातील सकल जैन समाज व अनेक भाविक यांनी दर्शनासाठी आपली हजेरी लावली यासाठी चांदवड पोलीस स्टेशन व सोमा टोल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.