मुंबई – चीन प्रमाणेच भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. या दोन्ही देशात सर्वसाधारणपणे एक किंवा दोन मुले असण्याला नागरिक प्राधान्य देतात. त्यामुळे सहाजिकच जास्त मुले जन्माला घालणाऱ्या दाम्पत्याबद्दल भारतात वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होते. पूर्वीच्या काळी मात्र साधारणत: एखाद्या महिलेला पाच किंवा सात मुले असत. परंतु अमेरिकेत मात्र एका ३२ वर्षीय महिलेने तब्बल १२व्या मुलाला जन्म दिला आहे.
अमेरिकेतील कॅन्सस शहरातील ब्रिटनी चर्च (वय ३२) ही महिला अलिकडेच आपल्या १२ व्या मुलाची आई बनली आहे. सुमारे एक आठवड्यापूर्वी याबाबत स्वतः तिने टिकटॉकद्वारे सांगितले की, आमच्या घरात लहान बाळ (मुलगी) आले आहे. पण जेव्हा तिने सांगितले की, मी १२ व्या वेळा आई झाले तेव्हा तिला सगळ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली.
यानंतर ब्रिटनी चर्चने केवळ ट्रोलर्सना प्रतिसाद दिला नाही तर तिने आपली योजना काय असणार आहे हे देखील सांगून टाकले. एवढेच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने स्पष्ट केले की, यापुढे ती आता किती मुले जन्माला घालणार आहे. तसेच ब्रिटनीने नवजात मुलाचा फोटो शेअर केला, त्यानंतर मोठ्या संख्येने फॉलोअर्सनी देखील ब्रिटनीचे अभिनंदन केले. तिने बाळाचे नाव रोविन ठेवले आहे.
सोशल मीडियाद्वारे ब्रिटनी म्हणाली की, मला किती मुले आहेत? आणि लोक याबद्दल काय विचार करतात? याचा मला काही फरक पडत नाही. कारण मी माझ्या मुलांसह आनंदी आहे. १२वे मुल हे काही आमचे अखेरचे मुल नाही. ब्रिटनी चर्च, तिचे पती आणि सर्व मुलांसोबत एकत्र राहतात. ब्रिटनी आणि तिचा पती ख्रिस दर आठवड्याला तब्बल २३० पाउंड खर्च करून आपल्या १२ मुलांचे संगोपन करतात. त्यासाठी तिचा पती दर आठवड्याला पाच पॅकेट धान्य व किराणा तसेच ६६ पॅकेट दूध खरेदी करतो. विशेष म्हणजे ब्रिटनीचे पहिले मूल जन्माला आले तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती.