नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन मासेमारी नौकांमधून तब्बल ३२.८६९ किलो परदेशी स्त्रोत असलेले सोने जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची किंमत २०.२१ कोटी रुपये आहे. हे सोने श्रीलंकेतून तस्करी करुन तटवर्ती भागातून भारतात आणले जात होते. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI), भारतीय तटरक्षक दल (ICG) मंडपम आणि रामनाड सीमाशुल्क, प्रतिबंधक विभाग यांनी संयुक्त कारवाई केली.
विविध टोळ्यांद्वारे मासेमारी नौकांचा वापर करून श्रीलंकेतून तामिळनाडूतील रामनाड येथील वेधलाई किनारपट्टीद्वारे परदेशी सोन्याची तस्करी केली जात असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या चेन्नई विभागाने विशिष्ट विकसित गुप्तचरांकडून मिळवली होती. त्यानुसार, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने किनारपट्टीवर व्यापक पाळत ठेवली आणि संशयित मासेमारी नौका शोधून काढली.
समुद्रात पाठलाग केल्यानंतर ३० मे २०२३ रोजी सकाळी महसूल गुप्तचर संचालनालयाचे अधिकारी आणि तटरक्षक दलाचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने एक संशयित मासेमारी नौका अडवली. नौका अडवल्यानंतर मासेमारी बोटीतील व्यक्तींनी प्रतिबंधित पार्सल समुद्रात टाकले. ७.१३ कोटी रुपये किंमतीचे ११.६ किलो परदेशी सोने असलेले प्रतिबंधित पार्सल तटरक्षक दलाच्या तज्ञ पाणबुड्यांच्या मदतीने समुद्राच्या तळातून परत मिळवण्यात आले आणि सोन्याच्या तस्करीसाठी वापरण्यात आलेली बोट देखील जप्त करण्यात आली.
३० मे २०२३ च्या रात्री, दुसरी संशयित मासेमारी बोट शोधून काढण्यात आली. त्यानंतर, महसूल गुप्तचर संचालनालयाचे अधिकारी भारतीय सीमाशुल्क गस्ती नौकेवरुन संशयित मासेमारी बोटीकडे रवाना झाले. बोटीवरचे लोक किनाऱ्यावर थांबलेल्या दोन व्यक्तींकडे हे पार्सल सुपूर्द करत असल्याचे या अधिकाऱ्यांनी दूरून पाहिले. भारतीय सीमाशुल्क गस्ती बोट समुद्राच्या बाजूने आपल्या जवळ येत असल्याचे दिसल्यावर किनाऱ्यावरील या दोन्ही व्यक्तींनी तस्करीचे सोने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र या अधिकाऱ्यांनी अंधारातही त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
या व्यक्तींची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या जॅकेटमध्ये आठ पाकिटे आढळून आली. सविस्तर तपासणीनंतर या व्यक्तींकडून १३.०८ कोटी रुपये किमतीचे २१.२६९ किलो परदेशी सोने जप्त करण्यात आले. यासोबतच, सोन्याची तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेली बोट आणि एक दुचाकी देखील जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
32 KG Gold Seized from 2 yatch