नोएडा (उत्तर प्रदेश) – रेरा थकबाकीच्या वसुलीसाठी येथील प्रशासनाने थकबाकीदार बांधकाम व्यवसायिकांवर फास आवळला आहे. या ३२ थकबाकीदार बांधकाम व्यावसायिकांची ३१५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेच्या जप्तीसह त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.
नोएडाचे जिल्हाधिकारी सुहास एलवाई यांनी सांगितले की, रेराअंतर्गत जारी करण्यात आलेल्या थकबाकीच्या वसुलीसाठी जिल्हा प्रशासनाने तीन तालुक्यात मोहीम राबवत थकबाकीदार बांधकाम व्यावसायिकांची संपत्ती जप्त केली जात आहे. या मोहिमेंतर्गत ३२ बांधकाम व्यावासायिकांची जवळपास ३१५ कोटी रुपयांची मालमत्ता जिल्हा प्रशासनाने जप्त केली आहे.
या मालमत्तेत १६२ फ्लॅट, सहा भूखंड आणि २८ बंगल्यांचा समावेश आहे. या मालमत्तेची ऑनलाइन लिलाव केला जाणार आहे. जप्त केलेल्या मालमत्तेच्या खरी किमतीचे आकलन करण्यासाठी उपनिबंधक विभागाकडून त्याचे मूल्यांकन केले जात आहे. थेट किमतीच्या आधारावर या मालमत्तेची किंमत ठरवली जाईल.
लिलावात ग्राहकांची पाठ
प्रशासनाकडून जप्त केलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या मालमत्तेचा लिलाव आधीसुद्धा ठवण्यात आला होता. दादरी तालुक्यात बोली लावण्यात आली होती. परंतु मालमत्तेच्या खरेदीसाठी ग्राहक आलेच नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ऑनलाइन लिलाव करण्याची विनंती केली आहे.