चंदीगड (पंजाब) – वृक्ष आणि मनुष्य यांचे नाते अतिप्राचीन असून कोणताही वृक्ष हा एक प्रकारे मानवाचा मित्र असतो. आजच्या कोरोना काळात तर ऑक्सिजन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते. झाडांपासून आपल्याला फुकट ऑक्सिजन मिळतो. निसर्गात विविध प्रकारची झाडे आपण पाहतो. काही झाडे अति उंच वाढतात, तर काही जमिनीला समांतर पसरतात. पंजाबमधील एका गावात एक झाड सुमारे ३०० वर्षापासून साडेतीन एकरावर पसरलेले आहे. निसर्गाच्या या किमयेबद्दल सर्वांनाच विलक्षण आश्चर्य वाटते.
पंजाबमधील फतेहगड साहिब जिल्ह्यातल्या चेलती कलान या गावात जवळजवळ ३०० वर्ष जुन्या वटवृक्षाच्या पारंब्या सुमारे साडेतीन एकर क्षेत्रात पसरलेल्या आहेत. या झाडाच्या छायेखाली मोठ्या संख्येने पक्षी आणि वन्य प्राणी राहतात. या खेड्यातील आणि आसपासच्या गावातील लोकांचे या झाडावर खूप प्रेम असून ते त्याची पूर्ण काळजी घेतात.
या झाडाची केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात एक वेगळी ओळख आहे. हे आजच्या पर्यावरण दिनानिमित्त या झाडाबद्दल सर्वांना सांगणे महत्वाचे वाटते. कारण एकीकडे जंगलांची जंगले नष्ट होत आहेत, तर देशात काही गावे अशी आहेत की, ज्यांनी अशा वटवृक्षांचे जतन केले आहे.
चोलती गावतील या वटवृक्षामुळे येथे जैवविविधता कायम आहे. येथे मोर, घुबड, साप, मॉनिटर सरडा, बाग सरडा, किडे तसेच मिलिपीड्स, नेमाटोड्स, ब्रायोफाईट्स यासह पंजाबच्या बहुतेक भागांत नामशेष होणारे पक्षी, प्राणी आणि अनेक जीवजंतूंचे घर आहे.
आज, संपूर्ण देश कोरोनामुळे ऑक्सिजन शोधत आहे, तसेच ऑक्सिजनचा मुख्य स्त्रोत झाडे वाचवण्यासाठी त्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. पण त्याचबरोबर काही खेड्यांमधील लोकांचा पर्यावरण प्रेम, विश्वास आणि समर्पण भावना यामुळे अशी झाडे जगली आहेत. पंजाब जैवविविधता मंडळाच्या सहकार्याने संवर्धन व व्यवस्थापन यासाठी या ‘कल्प वृक्ष’ जागेला जैवविविधता वारसा म्हणून घोषित करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे.
पंजाबमध्ये दिवसेंदिवस गहू व भात पिकाचे क्षेत्र वाढल्यामुळे वृक्षांचे बळी जात आहेत. या राज्यातील जंगलाखालील क्षेत्र केवळ पाच टक्के राहिले आहे. ते वाढविण्यासाठी, पंजाब शेतकरी आयोगाने २०१९ मध्ये एक कृषी धोरण तयार केले होते, ज्यामध्ये प्रत्येक गावात एक हेक्टर जमीन जैवविविधतेसाठी सोडली जावी, असा प्रस्ताव होता. परंतु हे धोरण गेल्या तीन वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालयाच्या फायलींमध्ये धूळ खात पडून आहे. मात्र हे धोरण अंमलात आले असते तर पंजाबच्या ३० हजार एकर जागेचे पाच वर्षात जंगलात रूपांतर झाले असते.