विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
विमान प्रवास करताना कोरोना चाचणी प्रमाणपत्र दाखविणे आवश्यक असते. तसेच विमानतळावर देखील कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र सुमारे ३०० प्रवाश्यांनी चाचणी न करता आसामच्या सिलचर विमानतळावरुन पळ काढला.
या घटनेसंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे प्रवाशांचे तपशील असल्याने सर्वांची नावे शोधून काढलेले आहेत. कोरोना चाचणी न घेता विमानतळावरून पळून जाणाऱ्या या प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच पळून जाणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
काचार जिल्ह्याचे अतिरिक्त उपायुक्त सुमित सत्त्वान यांनी सांगितले की, देशातील विविध भागातून एकूण ६९० प्रवासी सहा विमानांनी सिल्चर विमानतळावर दाखल झाले. या प्रवाशांचे नमुने कोविड -१९ चाचणीसाठी विमानतळावर आणि जवळच्या टिकोल मॉडेल रुग्णालयात घेण्यात येणार होते. यापूर्वी तपासणी फीसाठी ५०० रुपये भरण्यासाठी सुमारे दोनशे प्रवाश्यांनी या ठिकाणी गोंधळ उडाला.
दरम्यान, आसाम सरकारने राज्यात हवाई मार्गाने येणाऱ्या सर्व प्रवाश्यांसाठी कोविड -१९ चाचणी अनिवार्य केली आहे. ज्या अंतर्गत जलद चाचणी विनामूल्य केली जाते मात्र त्यानंतर आरटी-पीसीआर चाचणी ज्यासाठी ५०० रुपये द्यावे लागतात. ६९० प्रवाशांपैकी केवळ १८९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आणि त्यापैकी सहा जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले असून बाकी प्रवासी आसामऐवजी मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरासारख्या शेजारील राज्यांमधील रहिवासी असल्याने अनेक प्रवाश्यांना तपासणीतून बाहेर काढण्यात आले. मात्र ३०० लोक तपासणी विना पळाले.