इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लहान मुलांना सांभाळणे ही साधी गोष्ट नाही, पालकांना त्यांच्यावर नेहमीच लक्ष ठेवावे लागते. लहान मुलांच्या आई-वडिलांनी सावधगिरी बाळगावी, अन्यथा अपघात होतात, अशीच एक घटना इंदूर शहरात घडली. खेळता खेळता ३ वर्षांच्या लहानग्याचा मृत्यू झाल्याची ही घटना घडली आहे. आई या लहानग्याच्या धाकट्या भावाला म्हणजे बाळाला झोपवत होती, तेवढ्यात हा ३ वर्षांचा मुलगा तिथून निघून खेळायला बाहेर गेला. हा लहानगा खेळता खेळता लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडला, या खड्ड्यात पावसामुळे पाणी भरलेले होते. डोक्याला दुखापत झाल्याने आणि पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. दोन तासांनी लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या या डक्टमध्ये या लहानग्याचा मृतदेह सापडला. कुटुंबीय त्याला घेऊन धावत पळत डॉक्टरकडे पोहचले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
इंदूरच्या मनभावन नगरमध्ये संध्याकाळी ही घटना घडली. या परिसरात ३ मजल्याच्या बिल्डिंगचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी मुन्ना निगवाल आणि त्याची पत्नी रखवालदारी करतात. सोमवारी संध्याकाळी चारच्या सुमारास काही मजूर चहासाठी बाहेर गेले, त्यांच्यासोबत मुन्नाही गेला. घरात त्याची पत्नी, मोठा मुलगा राजवीर आणि त्याचा धाकटा भाऊ असे तिघेच होते. आई लहान बाळाला झोपवत होती. त्यावेळी ३ वर्षांचा राजवीर बाजूलाच होता. अचानक तो खेळायला निघून गेला. आईने हाका मारल्या, पण उत्तर आले नाही. त्यानंतर राजवीरची शोधाशोध सुरु झाली.
तीन वर्षांच्या राजवीरला शोधण्यासाठी आई, वडील आणि मजुरांनी सगळीकडे धावाधव केली. रस्त्यावर लोकांना मोबाईलमधील त्याचे फोटो दाखवले. अखेरीस कुठे न सापडल्याने परत आल्यानंतर लिफ्टच्या डक्टजवळ आले. त्यावेळी त्यांना राजवीरचा मृतदेहच दिसला. मजूरांनी खाली उतरुन त्याला वर आणले आणि धावत पळत त्याला डॉक्टरकडे नेण्यात आले. या लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यावरील झाकण हटवण्यात आले होते.
लिफ्ट लावणारी टीम आली असल्याने हे झाकण काढण्यात आले होते. ही सगळी मंडळी तिथून गेल्यानंतर काही वेळातच हा प्रकार घडला आहे. या सगळ्या प्रकाराबाबत परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. घरातल्या लहान मुलांकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आली आहे. लहान मुलांना अनेकदा नेमके आपण कुठे खेळतो आहोत, त्याच्यामुळे काय घडू शकते, या धोक्यांची कल्पना नसते. अशा स्थितीत पालकांनी त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
3 Year Old Child Fell in Elevator Duct
Indore Madhya Pradesh