नवी दिल्ली – गेले दीड वर्ष कोरोना महामारीने जगभरात प्रचंड थैमान घातले असून आता काही देशात त्याचा संसर्ग कमी होत असतानाच काही देशांमध्ये मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा प्रभाव वाढू लागला आहे. त्यातच आता पुन्हा एक नवीन संकट निर्माण झाले आहे. कारण आता कोरोना सारखेच आणखी ३ धोकादायक विषाणू सापडल्याने शास्त्रज्ञांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
कोरोना विषाणू प्रमाणेच सुमारे ९६ टक्के सारखेपणा तथा एकरूपता दर्शविणारे नवीन तीनही विषाणू लाओसमधील वटवाघळांमधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये आढळले. आतापर्यंत माहित झालेल्या सर्व विषाणूंपैकी ते कोरोनाच्या सर्वात जवळचे वाटत असल्याचे सांगितले जाते. ब्रिटनच्या ग्लासगो विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डेव्हिड यांनी या विषाणूंचे वर्णन अतिशय धोकादायक असे केले आहे. या भीतीचे सर्वात मोठे कारण म्हणजे नवीन विषाणू मानवांना संक्रमित करण्यास सक्षम आहेत.
‘द नेचर’ जर्नलच्या वृत्तात शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरसमध्ये सापडलेल्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेन हा नवीन व्हायरसमध्ये समान प्रमाणात सापडला आहे. शास्त्रज्ञांच्या या नव्या शोधामुळे, पृथ्वीवर मोठ्या संख्येने कोरोना व्हायरस असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पॅरिसमधील पाश्चर इन्स्टिट्यूटचे व्हायरोलॉजिस्ट मार्क एलोइट यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह लाओसमधील गुहेतून ६४५ वटवाघळांचे नमुने घेतले. यापैकी, BANAL-52, BANAL-103 आणि BANAL-236 या विशिष्ट जातीच्या तीन वटवाघळांमध्ये तीन नवीन विषाणू आढळले. यापैकी, BANl-52 ते कोरोना विषाणूचे एकरूपता ९६.८ टक्के आहे.
काही शास्त्रज्ञांच्या मते, तीनही नवीन व्हायरसचे अनुवांशिक कोड कोरोना विषाणूची उत्पत्ती नैसर्गिक मानण्यास वाव आहे. तर सिंगापूरमधील ड्यूक-एनयूएस मेडिकल स्कूलचे तज्ज्ञ लिनफा वांग यांनी देखील कोरोना विषाणूचे मूळ नैसर्गिक असल्याचे वर्णन केले आहे. हनोई स्थित वन्यजीव संवर्धन सोसायटी व्हिएतनाम तज्ञ अॅलिस लॅटिनने सांगितले की, दक्षिण चीनमधील थायलंड, कंबोडिया आणि युनानमध्ये आतापर्यंत सापडलेल्या कोरोना विषाणू मुळे हे स्पष्ट झाले की दक्षिण आशिया हे कोरोनासारख्या इतर व्हायरसचे हॉटस्पॉट बनले आहे.